दूध दरवाढ, कर्जमाफीसाठी किसान सभेचा सांगलीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

सांगली - राज्य शासनाने वेळोवेळी आश्‍वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत आज किसान सभेने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

सांगली - राज्य शासनाने वेळोवेळी आश्‍वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत आज किसान सभेने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागण्या मान्य का होत नाही, असा जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांनी प्रति सभा घेऊन सरकारवर हल्लाबोल केला.

किसान सभेचे नेते उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग चौकातून मोर्चाला सुरवात झाली. 1 जूनपासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध यल्गार केला आहे. त्याची सरकार दखल घेत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत मोर्चा निघाला. लॉंग मार्चवेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. देवस्थान जमिनी खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची बेकायदा कामे थांबवावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेशव्दारावर रोखून धरले. त्यामुळे बाचाबाची झाली. आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली आणि पोलिस ठाण्यात जाऊन सरकारविरुद्ध आवाज उठवला. 

दिगंबर कांबळे, गवस शिरोळकर, डॉ. सुदर्शने धेरडे, नंदकुमार गोडबोले, बाळासाहेब गुरव, नारायण चौगुले, युवराज गुरव, नारायण पवार, लतिफ शिरोळकर, महंमद शिरोळकर, मज्जीद शिरोळकर, बंडू जाधव, हणमंत कोळे आदी उपस्थित होते. 

Web Title: Sangli News agitation of Kisan Sabha for hike in Milk rate