‘म्हैसाळ’साठी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला १० मार्चपूर्वी पाणी सोडा. अन्यथा, मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी आम्ही गाडी अडवून त्यांना जाब विचारू, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला १० मार्चपूर्वी पाणी सोडा. अन्यथा, मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी आम्ही गाडी अडवून त्यांना जाब विचारू, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, काँग्रेस नेते प्रा. सिद्धार्थ जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, अनिल आमटवणे, दिलीप बुरसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद इनामदार यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची भेट घेऊन इशारा दिला.

श्री. होनमोरे म्हणाले, ‘‘मिरज पूर्व भागातील पिके वाळून चालली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी आता तातडीने सुरू केलेच पाहिजे, अन्यथा शेतीवर संकट कोसळणार आहे. गेल्यावर्षी निवडणुकीसाठी मागणी न करता पाणी देण्यात आले. आता शेती संकटात असताना पाणीपट्टीसाठी  अडवणूक का करता? शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार आहेत, मात्र आधी पाणी सुरू करा. तसे न केल्यास  येत्या ११ मार्चला मुख्यमंत्र्यांची गाडी सांगलीत कुठेही अडवू. त्यावेळी काही अनुचित घटना घडल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.’’

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा अंत न पाहता म्हैसाळ योजना त्वरित सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्या. शेतकरी संकटात आहेत. द्राक्ष, ऊस, भाजीपाला पिके वाचवण्यासाठी वेळेत पाणी दिले पाहिजे.’’

श्री. इनामदार म्हणाले, ‘‘काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथे टॅंकरने पाणी, चाराछावण्या द्याव्या लागतील, अशी भीती आहे. पाणी लवकर सुरू झाले तर संकट टळणार आहे.’’

या वेळी वास्कर शिंदे, शिवाजी महाडिक, तुषार खांडेकर, गणेश देसाई, पांडुरंग माने, मोहन शिंदे, पांडुरंग माने, विराज कोकणे, कपिल कबाडगे, राजेश जमादार, महावीर खोत, आर. आर. पाटील, गंगाधर तोडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News agitation for Mheshal water