मरळनाथपूरला कृषी अनुदानात घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

सांगली - मरळनाथपूर (ता. वाळवा) येथी कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वीज कनेक्‍शन नसलेल्या २८ जणांना कृषी पंप, मृत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्याचे अनुदान आणि भूमिहीनांना कृषी योजनांचा लाभ देऊन कृषी विभागाने हा भ्रष्टाचार केल्याचा पुरावा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर सादर केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हे गाव आहे. 

सांगली - मरळनाथपूर (ता. वाळवा) येथी कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वीज कनेक्‍शन नसलेल्या २८ जणांना कृषी पंप, मृत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्याचे अनुदान आणि भूमिहीनांना कृषी योजनांचा लाभ देऊन कृषी विभागाने हा भ्रष्टाचार केल्याचा पुरावा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर सादर केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हे गाव आहे. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, सचिव त्रिगुण कुलकर्णी यांच्यासमोर हे पुरावे सादर केले. त्यावर ‘सकृतदर्शनी घोटाळा झाल्याचे दिसत असून  त्याची सखोल चौकशी करावी’, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या संपूर्ण योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणीच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून त्याची चौकशी करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तांना पाठवले आहे.

बी. जी. पाटील आणि सुयोग औंधकर यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा तक्रार केली होती.  कृषी विभागाने त्याची दखल घेतली नाही. काही अधिकाऱ्यांचे पथक पाठवून चौकशी केली, या प्रकरणात काही घडलेच नाही, असा अहवाल सादर केला. त्यावर संशय व्यक्त करत तक्रारदारांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दाद मागितली. त्या समितीची आज बैठक होती. जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानी होते. चार पिशव्या भरून पुराव्यांच्या फायली आणल्या होत्या. त्यांनी त्यापैकी काही महत्त्वाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर  सादर केले. हे पुरावे महत्त्वाचे असल्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. 

२८ पंपांचा घोटाळा
मरळनाथपूर येथील २८ शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप झाले. त्यासाठी या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्‍शन आहे काय? याचा दाखला जोडावा लागतो. वास्तविक, वीज कनेक्‍शन नसताना हे पंप दिले गेले. कनेक्‍शन नाही, याचा पुरावा म्हणून महावितरणकडील कनेक्‍शन धारकांची यादी सादर केली. हे प्रकरण सप्टेंबरमध्ये चौकशीला दिले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. शब्दखेळ करत प्रकरण दडपले, असा आरोप बी. जी. पाटील यांनी केला. फलोत्पादन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला, त्याची फाईल स्वतंत्रपणे सादर करण्याचे आदेश दिले. 

मृत लाभार्थी
रामचंद्र दादू खोत या मृत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप करत त्यांचा मृत्यूचा दाखला सादर केला. ही व्यक्ती ३० ऑगस्ट १९९० ला मृत झाल्याचा दाखला दिला आहे, यांच्या नावे २०१५-१६ ला अनुदान देण्यात आले. 

इंचभर जमीन नाही, पण लाखोंचे अनुदान
संदीप शामराव खोत यांच्या नावे इंचभरही जमीन नाही, तरी त्यांना १ लाख ३३ हजार रुपयांचे कृषी अनुदान दिल्याचे पुरावे सादर केले. त्यात म्हशीचा गोठा, पलटी, नांगर आदींसाठी अनुदान लाटल्याचे पुरावे दिले. अशाच पद्धतीने सुनील मारुती खोत यांना ३.६५ लाख रुपयांचे अनुदान दिल्याचे पुरावे सादर केले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे.

कृषी अधिकारी निरुत्तर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे या बैठकीला हजर होते. त्यांच्याकडेच पहिला चौकशी अर्ज आला होता. त्यांनी एक पथक मरळनाथपूरला पाठवले होते. त्याने इथे काही घोटाळा झाला नाही, असा अहवाल सादर केला होता. त्यामुळे पुरावे समोर आल्यानंतर साबळे यांची पंचाईत झाली. त्यांनी मूळ अर्जात कृषी पंप घोटाळा, हा शब्दच नव्हता, या असा खुलासा केला. 

घोटाळ्यात जे असतील त्यांच्यावर कारवाई : सदाभाऊ
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘‘प्रकरण माझ्या गावातील आहे म्हणून माझ्यावर आरोप करू नका, फलोत्पादन योजना तर २०१४ मधील आघाडी सरकारच्या काळातील आहे. मरळनाथपूरमधील कृषी योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी अधिकारी करतील व शासन कारवाई करेल. माझ्या  गावचा म्हणून मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. मात्र आरोप करणाऱ्यांची पात्रताही तपासली पाहिजे. आरोप करणाऱ्यात काही खंडणीबहाद्दर आहेत. याआधीही तक्रारी झाल्या, चौकशी झाली, त्यात काही निष्पन्न झाले नाही. अधिवेशन काळात असे काही प्रकार करण्यामागे  बोलवता धनी वेगळाच आहे.’’

Web Title: Sangli News Agricultural subsidy scam in Maralnathpur