पिकवण्यापेक्षा विकायला चला ! 

पिकवण्यापेक्षा विकायला चला ! 

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सध्या देशभरात ऐरणीवर असताना शेती शेतकऱ्यांना जगवू शकेल असा प्रश्‍न सतत नव्या स्वरूपात पुढे येतो. त्याचं काही एक उत्तर शोधायचा प्रयत्न मिरज तालुक्‍यातील दुधगावच्या अविनाश कुदळे यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार जयंत पाटील यांनी आफ्रिकेत शेती करायला चला, असं आवाहन केले होते. त्यावेळी "साहेब म्हणत्यात जाऊन तर बघू..!' म्हणून जिल्ह्यातील अनेकांनी आफ्रिका दौरा केला. अविनाश यांनी 2013 मध्ये पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल राज्य गाठले. 

युरोपीयन देशांच्या सीमेवरचा हा भाग. अमाप शेत जमिनींचा. आफ्रिकन सरकारचे जगभरातील लोकांना शेती कसायला या म्हणून पायघड्या घालून स्वागताचे धोरण होते. अविनाश यांनी पन्नास हेक्‍टर शेतजमीन वार्षिक सहा हजार रुपये भाड्याने घेतली. तिथे शेजारच्या तलावातून त्यांनी पाण्याची सोय केली. भाताचे पीक घेतले. 2014 पर्यंत त्यांनी भाताची तीन पिके घेतली. भाताचे चांगले पीकही आले. त्यावेळी त्यांनी शेतजमिनीसाठी भारतातून किर्लोस्कर कंपनीचे पंप नेले होते. त्या पंपांसाठी तिथून विचारणा सुरू झाली. त्याच दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून बीन्स, ढबू, कांदा, अननस, आंबा, तसेच भाजीपाला, फळ पिके निर्यातीच्या काही संधी दिसल्या. युरोपीयन बाजारपेठेसाठी निर्यात करता येईल अशा रोटाडॅम (नेदरलॅंड) या बंदरामधून त्यांनी त्याची निर्यात केली. सुरवातीला काही स्थानिक रजिस्टर कंपन्यांच्या माध्यमातूनच थोडीफार गुंतवणूक करून त्यांनी यातल्या संधीही पाहिल्या. वर्ष दोन वर्षांच्या अनुभवातून पिकवण्यापेक्षा विकण्यात अधिक पैसा असल्याचे सामान्य ज्ञान त्यांना अनुभवाला आले आणि यातच संधी शोधायचा निर्णय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी "इंडोसेन ऍग्रो' या कंपनीची स्थापना केली. 

या कंपनीच्यावतीने भारतातून सिंचनासाठी वीज पंप निर्यात करण्यास त्यांनी सुरवात केली. किर्लोस्कर आणि कोमेट कंपनीच्या पंपांना तिकडे चांगली मागणी आहे. गेल्या वर्षभरात दोन छोट्या सिंचन योजनांची कामेही पूर्ण केली आहेत. ही कामे ते उक्ती घेतात आणि पूर्ण करून देतात तसेच आफ्रिकेतून युरोपीयन देशांमध्ये शेतमाल निर्यातीकडेही ते वळले आहेत. ते म्हणाले,""कंपनीचे डकार शहरात छोटे कार्यालय आहे. माझे एक मित्र सुरेश गडदे तेथे व्यवस्थापकीय जबाबदारी सांभाळतात. गेल्यावर्षी आम्ही तिथून 22 रुपये किलोप्रमाणे काही तूर भारतात विक्रीसाठी आणली होती. यंदा मोठ्या प्रमाणात तूर आणायची असे नियोजन केले होते. मात्र भारतातच तुरीचे बंपर उत्पादन झाले. परदेशातून शेतमाल आयातीवर भारतात खूपच बंधणे आहेत. मुक्त आयात झाली तर इथल्या शेतीसमोर खूप मोठी आव्हाने निर्माण होऊ शकतील. गेल्या चार वर्षांच्या अनुभवातून आफ्रिका आणि युरोपीयन देशात शेतमाल निर्यातीच्या खूप संधी समोर दिसतात. यात अधिक लक्ष देऊन हा व्यवसाय वाढवण्याचा मनोदय आहे. शेती करायला म्हणून देश सोडला आणि संधीचे हे द्वार खुले झाले आहे. यात यशस्वी झालो असा दावा करणे घाईचे ठरेल; मात्र गावातील वडिलोपार्जित शेती करण्यापेक्षा मला तिकडे अधिक संधी दिसतात. पिकवण्यापेक्षा विकण्यात अधिक पैसा भारतातही आहे. परदेशात तर अधिक आहे हे नक्की !' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com