सदाभाऊंच्या गावात कृषी खात्याची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सांगली -  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावात कृषी खात्याच्या पथकाने चौकशी केली. कोरडवाहू शेती अभियानात या गावात घोटाळा झाल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाचे पथक या गावात धडकले. त्यांना फार काही हाती लागले नसल्याची प्राथमिक माहिती पुढे आली  असून, सविस्तर अहवाल आणि पंचनामे हाती येण्याची प्रतीक्षा असेल.

बळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदन आणि माहिती अधिकारातील माहिती सुपूर्द केली. त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर गावामध्येच घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोरडवाहू शेती अभियानात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी लावा, या मागणीला पालकमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला. ‘बळीराजा’च्या आरोपानुसार, कृषी सहायक, मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी राजकीय मंडळींच्या संगनमताने अनुदान लाटून भ्रष्टाचार केला आहे. ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रेलर, स्प्रे पंप, तुषार सिंचन संच, पीव्हीसी पाईप, इलेिक्‍ट्रक मोटर शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत, असा आरोप आहे. या वस्तूंची खरेदी केली, मात्र लाभार्थींना त्या मिळाल्याच नाहीत. कोरडवाहू शेतकऱ्यांनी त्याचा लाभ झाला नाही, हा मुख्य मुद्दा चर्चेत आला. 

या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागातील साखळीही चर्चेत आली. हरितगृह, शेडनेट अनुदानासह अन्य लाभ योजनांमध्ये घोटाळ्यांचे आरोप सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या एका पथकाने सदाभाऊ खोत यांच्या गावात धडक दिली. 

या पथकाने लाभार्थींच्या घराघरांत जाऊन वस्तू आहेत का, याची पाहणी केली. त्याची प्राथमिक माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. सविस्तर अहवाल मिळेल, असे सांगितले जात आहे.

मरळनाथपूर ओके,बाकी ‘बोके’ कधी?
मरळनाथपूर हे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव असल्याने तेथील घोटाळ्याचा आरोप सरकारच्या दृष्टीने व कृषी खात्याच्या दृष्टीने संवेदनशील होता. त्यामुळे तत्काळ त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. वाळवा तालुक्‍यात अन्यत्र ग्रीन हाऊस आणि शेडनेट अनुदानात घोटाळ्यांचा आरोप आहे. बोगस बिले, एकाच गट क्रमांकावर चार-चार जणांना अनुदान मिळाल्याचे प्रकार चर्चेत आहेत. ते ‘बोके’ चौकशीच्या कक्षेत कधी येणार, याकडे आता लक्ष असेल. 

Web Title: sangli news agriculture department visit maralnathpur