हल्लाबोल आंदोलनानंतर अंतर्गत गटबाजीवर निर्णय - अजित पवार

बलराज पवार
बुधवार, 4 एप्रिल 2018

सांगली - शहर जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर हल्लाबोल आंदोलनानंतर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. त्यावेळी जो निर्णय होईल तो मान्य करायला हवा अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजांना दिलासा दिला.

सांगली - शहर जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर हल्लाबोल आंदोलनानंतर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. त्यावेळी जो निर्णय होईल तो मान्य करायला हवा अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजांना दिलासा दिला.

माधवनगर रोडवरील सर्किट हाऊसवर कमलाकर पाटील गटाने  दोन्ही नेत्यांची भेट घेऊन संजय बजाज यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला.  कोल्हापूर जिल्ह्यातील सभा आटोपून हल्लाबोल आंदोलन यात्रेचे मंगळवारी रात्री सांगलीत आगमन झाले. त्यानंतर  सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक विष्णु माने आदींनी प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि अजित पवार यांची स्वतंत्रपणे रात्री उशिरा भेट घेतली.

सध्या हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. त्यामुळे गटबाजीचा मुद्दा बाजुला ठेवावा. आंदोलन संपल्यावर गटबाजीवर बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचारही केला जाईल. पक्षातील वातावरण कुणी दूषित करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. त्यावेळी पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावा लागेल. 

- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कार्यपद्धतीवर विरोधात त्यांनी तक्रारी केल्या. बजाज हे नगरसेवक असून शहर जिल्हाध्यक्षही आहेत. एकाचवेळी दोन महत्त्वाची पदे असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे, अशी तक्रार कमलाकर पाटील यांनी केली. नेत्यांनी बजाज यांना स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा देण्याची सूचना करुनही तो दिला नाही. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी माजी नगरसेवक हरीदास पाटील यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र पाटील यांना संधी न मिळाल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यामुळे आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली, असे कमलाकर पाटील यांनी नेत्यांना सांगितल्याचे समजते.  

मनमानी कारभारामुळे कार्यकर्ते व नगरसेवकांचे खच्चीकरण करण्याचे काम पक्षात सुरू आहे. त्या वेळीच थांबवणे आवश्‍यक आहे. याचा फटका महापालिका निवडणुकीत बसू शकतो. यामुळे पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असाही इशाराही पाटील यांनी दिला आहे.  

 

Web Title: Sangli News Ajit Pawar Comment