शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना काढणार - अजितराव घोरपडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कवठेमहांकाळ - उसाला चांगला दर व शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर लवकरच नवीन साखर कारखाना उभारणार असल्याची घोषणा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केली. या नवीन कारखान्याचे नेतृत्व युवा नेते राजवर्धन घोरपडे करतील, असेही त्यांनी जाहीर केले.

कवठेमहांकाळ - उसाला चांगला दर व शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर लवकरच नवीन साखर कारखाना उभारणार असल्याची घोषणा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केली. या नवीन कारखान्याचे नेतृत्व युवा नेते राजवर्धन घोरपडे करतील, असेही त्यांनी जाहीर केले.

जाधववाडी रोडवरील महांकाली मंगल कार्यालयात विकास आघाडीच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त ते बोलत होते. प्रारंभी विकास आघाडीतर्फे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा सपत्नीक कौटुंबिक सत्कार झाला. व्यासपीठावर मातोश्री लक्ष्मीदेवी, पत्नी जयमालादेवी, मुलगा राजवर्धन, स्नुषा प्रियांकितादेवी, मुलगी ऐश्वर्यादेवी, जावई याज्ञसिंह पाटणकर उपस्थित होते. 

अजितराव घोरपडे म्हणाले, ‘‘विकास आघाडी संघटना संकल्पनेचा जन्मच याच तालुक्‍यात झाला. ही संघटना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची आहे. संघटनेच्या माध्यमातून काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. सत्ता असो वा नसो; आपण संघटनेच्या माध्यमातून यापुढच्या काळात विभागातील शेतीला नवीन स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून विकास व प्रगती डोळ्यांसमोर ठेवत गावचा, तसेच तालुक्‍याचा विकास घडवावा.’’ येत्या काळात शाश्‍वत शेती निर्माण करण्यासाठी नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

युवा नेते राजवर्धन घोरपडे म्हणाले, शेतीवर आधारित लांडगेवाडीत फूडपार्क उभा केला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही दिली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मिरज, कवठेमहांकाळ तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच, सदस्यांचा सत्कार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते झाला.

स्वागत पांडुरंग पाटील यांनी केले. कार्यक्रमास महादेव माळी, अरविंद गडदे, शंकर गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या आशा पाटील, प्रा. सुभाष वायदंडे, प्रफुल्ल कदम, भारत डुबुले, जिल्हा परिषद सदस्या संगीता नलवडे, आशा पाटील, पंचायत समिती उपसभापती सरिता शिंदे, नगराध्यक्षा साधना कांबळे, उपनगराध्यक्षा स्वाती पाटील, बांधकाम सभापती सुनील माळी, तानाजी यमगर, बाळासाहेब कुमठेकर, दीपक शिंदे, तात्यासाहेब नलवडे, सुनील पाटील, अजितराव शिंदे, अरुण भोसले, तानाजी शिंदे, सुरेश सूर्यवंशी, दिलीप झुरे, दादासो कोळी, विष्णू मिरजे, दृष्यंत पाटील, बाबूराव सूर्यवंशी, प्रा. अनिलकुमार पाटील, पांडुरंगतात्या पाटील, दुधोंडीचे जे. के. जाधव, सविता माने, शहाजी निकम उपस्थित होते. आभार नगरपंचायतीचे बांधकाम सभापती सुनील माळी यांनी मांडले.

विकास आघाडीचे नामकरण...
१९९२ साली विकास आघाडी संघटना स्थापन झाली. संघटना काय असते व काय करू शकते, हे सर्वांनाच माहीत आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविले गेले. यापुढे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, यापुढे विकास आघाडीचे नाव आता ‘शेतकरी विकास आघाडी’ असेल, असेही माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी जाहीर केले.

Web Title: Sangli News Ajitrao Ghorpade Comment