जयंत पाटील यांच्या कासेगावात शेतकऱ्यांची पिळवणूक -  भारत पाटणकरांचा आरोप

अजित झळके
रविवार, 13 मे 2018

सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या  कासेगावचे (ता. वाळवा)  शेतकरी उपोषणाला बसले आहेत. याच गावातील जयंतरावांच्या गटाचे वर्चस्व असलेल्या भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेकडून पिळवणूक होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. जयंतरावांना कदाचित या प्रकरणाची माहिती नसावी, अन्यथा असे झाले नसते, अशी भूमिका पाटणकर यांनी व्यक्त केली आहे. 

या संस्थेने मयत 291 सभासदांच्या वारसांना सभासद करून न घेणे, त्यांना पाणी न देणे, पाझर कर लावणे, अडवणूक करणे, असे प्रकार सुरु केले आहे. त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी ठाण मांडले असून सोमवारपासून ते बेमुदत उपोषण करणार आहेत. 

श्री. पाटणकर म्हणाले, ""संस्थेचे 525 सभासद होते. जमिनींवर कर्ज काढून संस्था उभारली, कर्ज फेडले. त्यातील 234 सभासद जीवंत आहेत. मयतांच्या वारसांना सभासद करून घेतले जात नाही. पाणी हक्काने दिले जात नाही. पाझर कर लावून पिळवणूक होतेय. 19 जणांच्या तक्रारीनुसार पाझराचे साडेचार लाख रुपये वसुल केले. चहूबाजूंनी छळ सुरु आहे. त्याविरुद्ध गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. अन्याय निर्मूलन समिती संघर्ष करतेय. त्यावर वाळवा प्रांतांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, मात्र ती कार्यवाही करेल, अशी खात्री वाटत नाही. त्यांच्या चौकशीतून काय साध्य होईल, याची शंका वाटते. चार वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यामुळे कासेगावला कचेरी चौकात आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.'' 

ते म्हणाले, ""भैरवनाथ संस्थेतील मातब्बरांनी सामान्य शेतकऱ्यांना टाचेखाली ठेवण्याचे धोरण राबवले आहे. त्यांच्या विरोधात कुणी बोलायचे नाही. तसे झाल्यास पाणी बंद केले जाते. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरु राहील.'' 

Web Title: Sangli News allegations of Bharat Patankar