अंबाबाई मंदिरातील बळीची प्रथा बंद

संतोष भिसे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आणि तितक्‍याच पुरोगामित्वाची परंपरा असलेल्या मिरज शहराने सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामदेवता श्री अंबाबाई मंदिरात ३०० वर्षांपासून सुरू असणारा बळीचा विधी यंदापासून बंद करण्यात आला. मंदिराची विश्‍वस्त समिती आणि पुजारीवृंदाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. अंबाबाईच्या भक्तमंडळींनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले. 

पुरोगामी मिरजकरांचे परिवर्तनाचे पाऊल; परंपरेला पूर्णविराम

मिरज - सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आणि तितक्‍याच पुरोगामित्वाची परंपरा असलेल्या मिरज शहराने सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामदेवता श्री अंबाबाई मंदिरात ३०० वर्षांपासून सुरू असणारा बळीचा विधी यंदापासून बंद करण्यात आला. मंदिराची विश्‍वस्त समिती आणि पुजारीवृंदाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. अंबाबाईच्या भक्तमंडळींनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले. 

यंदाच्या नवरात्रात दुर्गाष्टमीला मेंढीऐवजी कोहळा कापण्यात येईल. त्याचाच तिलक देवीच्या मस्तकावर लावला जाईल. कोणताही शास्त्राधार नसलेल्या बळी विधीसाठी प्रत्येक वर्षी मेंढीचा बळी दिला जायचा. नवरात्रात अष्टमीच्या मध्यरात्री देवीच्या दारात कत्तल केली जाई. रक्ताचा टिळा देवीला लावला जाई. नंतर मटण आणि भाकरी असा देवीचा नैवेद्य भक्तमंडळी खात असत. सकाळी उजाडेपर्यंत बळी विधीचे नामोनिशाण संपून जायचे. काही वर्षांत या नैवेद्यासाठी मध्यरात्रीपासून अक्षरशः रांगा लागू लागल्या. 

काही वर्षांपूर्वी मंदिरात कलशारोहणसाठी आलेले करवीरपीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांनी अजाबलीच्या विधीवर नाराजी व्यक्त केली. मंदिराच्या आवारात नवरात्रात नऊ संगीताची आराधना चालते. प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमीला संगीत सभा होते. महाराष्ट्रातील अनेकांसाठी मिरजेची अंबाबाई आराध्यदेवता आहे. अशा पवित्र ठिकाणी निष्पाप कोकराचा बळी देणे मनाला वेदना देणारे आहे, अशी प्रतिक्रिया शंकराचार्यांनी व्यक्त केली. शहरातील अनेक भक्तांनीही प्रथेबद्दल नाराजी व्यक्त केली, त्याची दखल मंदिर व्यवस्थापनाने घेतली. 

प्रथेला शास्त्राधार नाही
१६५० ते १७०० या ५० वर्षांच्या कालावधीत मंदिराचे बांधकाम झाले. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ती कोणी व का सुरू केली?, त्याचा शास्त्राधार काय? याची उत्तरे इतिहासात नाहीत. महाराष्ट्रातील अनेक देवींच्या मंदिरांत बळीची प्रथा आहे. त्याचेच अनुकरण मिरजेतही झाले असावे. देवीचे महिषासुरमर्दिनीचे प्रतीक म्हणून पांढरा डाग नसलेल्या काळ्या मेंढीचा बळी दिला जातो. ही प्रथा खंडित करण्याचा पुरोगामी निर्णय मिरजकरांनी घेतला. ब्राह्मणपुरीच्या प्रवेशद्वारात सुरू असणारी पशुहत्येची परंपरा कडी-कोयंड्यात कुलूपबंद करण्याचे ठरविले.

Web Title: sangli news ambabai temple