मिरज पूर्वभागात प्राचीन जैन संस्कृतीचे अवशेष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सांगली - जैन धर्मातील प्राचीन संस्कृतीचे  अनेक पुरावे मिरज पूर्व भागात यापूर्वी निदर्शनास आले आहेत. या अनुषंगाने या भागातील डोंगर परिसरात उत्खनन व संशोधन होण्याची गरज आहे. भोसे, दंडोबा, कोंगनोळी, मल्लिकार्जुन डोंगर या भागात गेल्या काही वर्षांत तसे थोडेफार प्रयत्न झाले असता तशी झलक दिसून आली आहे.

सांगली - जैन धर्मातील प्राचीन संस्कृतीचे  अनेक पुरावे मिरज पूर्व भागात यापूर्वी निदर्शनास आले आहेत. या अनुषंगाने या भागातील डोंगर परिसरात उत्खनन व संशोधन होण्याची गरज आहे. भोसे, दंडोबा, कोंगनोळी, मल्लिकार्जुन डोंगर या भागात गेल्या काही वर्षांत तसे थोडेफार प्रयत्न झाले असता तशी झलक दिसून आली आहे.

इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर म्हणाले, ‘‘गिरिलिंग डोंगरावर जैन संस्कृतीचे संदर्भ आढळतात. कोल्हापूर, कराड येथे पुरातत्त्व विभागाने सुमारे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी उत्खनन केले होते. सांगली जिल्ह्यात हरिपूरला थोडेफार उत्खनन झाले. तेथे पाषाण युगातील काही अवशेष आढळले होते. मिरज पूर्व भाग, अग्रणीचा नदी काठावर मात्र असे उत्खनन झालेले नाही. जिथे खूप मोठा इतिहास दडला आहे. अग्रणी नदीकाठावरील पांढरीचे टेके आहेत तेथे असे उत्खनन गरजेचे आहे. दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ताम्र-पाषाण युगाच्या कालखंडाचे अनेक पुरावे तिथे सापडू शकतील. पुडे सातवाहन कालखंडाचे काही पुरावे तिथे आढळतील. गिरिलिंग डोंगरावरील पाण्याच्या टाक्‍या बुजल्या आहेत. या टाक्‍यांचे उत्खनन झाल्यास तेथे बौद्ध व जैन संस्कृतीचे अवशेष दिसतील. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातली कोंगनोळी येथे १९६५-६६ च्या सुमारास भगवान पार्श्‍वनाथांची मूर्ती आढळली होती. त्या मूर्तीचे सर्वांच्या सहभागाने मंदिर झाले आहे. याशिवाय तेथे अन्य काही मूर्तीही आढळल्या होत्या. एकूणच मिरज पूर्व भागातील भोसे, कळंबी, आरग, बेडग, लिंगनूर, मालगाव हा सारा परिसर प्राचीन जैन संस्कृतीचा परिसर आहे. त्यादृष्टीने या भागात संशोधन व उत्खनन गरजेचे आहे.’’

भोसे येथील प्रा. राहुल चौगुले म्हणाले, ‘‘गावातील जैन मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे असावे. या मंदिराचे मूळ रूप आता जीर्णोद्धारामुळे पालटले आहे. मूळ दगडी मूर्तीही बदलून तेथे श्‍वेत रंगातील मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. नव्वदच्या दशकात पुन्हा जीर्णोद्धार करून या मंदिरामध्ये आकर्षक काचकाम झाले. 

यावेळी भगवान महावीरांचे समवशरण मंदिराची उभारणी करण्यात आली. आता या मंदिरात अतिशय सुबक आणि भव्य काचकाम  व रंगकाम करून मंदिर सजवले आहे. त्यासाठी राजस्थान व कर्नाटकातून कारागीर आले होते. या मंदिरात महावीर व रत्नत्रय भगवानांच्या सुबक मूर्ती आहेत. आता संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातून या मंदिरात भाविक येत आहेत.’’

 

Web Title: Sangli News ancient Jain culture in the eastern part of Miraj