आरगमधील ‘त्या’ लेकींचं पालकत्व जिल्हा परिषदेकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सांगली - आईचं छत्र हरपल्यानंतर परिस्थितीशी दोन हात करीत जगणाऱ्या आणि एका दुर्दैवी घटनेत एक बहीण गमावलेल्या आरग (ता. मिरज) येथील ‘त्या’ तीन लेकींचे पालकत्व जिल्हा परिषदेने घेतले आहे. आरग येथे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी स्वतः भेट देऊन त्यांची व्यवस्था निवासी शाळेत करण्याचा निर्णय घेतला.

सांगली - आईचं छत्र हरपल्यानंतर परिस्थितीशी दोन हात करीत जगणाऱ्या आणि एका दुर्दैवी घटनेत एक बहीण गमावलेल्या आरग (ता. मिरज) येथील ‘त्या’ तीन लेकींचे पालकत्व जिल्हा परिषदेने घेतले आहे. आरग येथे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी स्वतः भेट देऊन त्यांची व्यवस्था निवासी शाळेत करण्याचा निर्णय घेतला. त्याला मुलींच्या वडिलांनी मान्यता दिली. त्यापैकी गौरी हिच्या अपघाती मृत्यूमुळे विम्यासाठी दावा करून अन्य मुलींच्या भवितव्याची  तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आरग येथील चार छोट्या बहिणींची हृदयद्रावक कथा आज ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाली. गेल्या आठवड्यात या चार बहिणींपैकी गौरी या नऊ वर्षाच्या मुलीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी आईच्या मृत्यूनंतर या पोरी पोरक्‍या झाल्या. त्या एकमेकींची काळजी घेत, हाताला हात धरून वाढत होत्या. एका अपघाताने त्यांच्या या लढाईतील एक आधार गळाला. या मुलींचे भवितव्य काय, हा प्रश्‍न साऱ्यांनाच पडलाय.

अशावेळी सौ. वाघमोडे यांनी आरग येथे चव्हाण मळ्यात जाऊन त्या मुलींची भेट घेतली. त्यांच्या वडिलांना भेटल्या. या मुली मोठ्या होताहेत, त्यांची जबाबदारी घेणे फार गरजेचे आहे. काही गोष्टी त्या बापाशीही बोलू शकणार नाहीत. त्यांना सुरक्षित वातावरण हवे, या बाबी त्यांनी समजून दिल्या. त्यामुळे त्यांना निवासी शाळेत घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोन शाळांची नावे सुचवण्यात आली. त्याचा निर्णय या मुलींचे शिक्षक अमोल शिंदे, पोपट निकम यांच्या पुढाकाराने होणार आहे.

सोबतच भक्तीला बुडण्यापासून वाचवणाऱ्या रोहित चव्हाण आणि अभिषेक बिंदले यांचे सौ. वाघमोडे यांनी कौतुक केले. त्यांची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी करावी, असा प्रस्ताव त्या मांडणार आहेत. डाएटच्या अधिव्याख्याता रसाळ, अर्चना सावंत, शुभांगी सावंत, संजय चव्हाण, आनंदराव चव्हाण 
उपस्थित होते. 

Web Title: Sangli News Arag Orphan girls issue