रक्कम न भरल्यामुळे तिल्याळच्या कर्जदाराची कारागृहात रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नोटीस मिळाल्यानंतरही कटरे यांनी रक्कम भरली नाही. त्यामुळे 2014 मध्ये जंगम मालमत्ता जप्तीसाठी वॉरंट काढले. 20 हजार रूपये जमा करून उर्वरीत रक्कम भरण्याचे आश्‍वासन कटरे यांनी दिले. रक्कम न भरल्यामुळे पुन्हा जप्ती वॉरंट काढले. परंतू जंगम मालमत्ता आढळली नाही.

सांगली - फायनान्स कंपनीची कर्जाची रक्कम न भरल्याबद्दल आरोपी रामचंद्र एकनाथ कटरे (रा. तिल्याळ-आसंगी, ता. जत) यांना तीन महिने कैदेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गोखले यांनी दिली. शिक्षेनंतर कटरे यांना ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली. 

अधिक माहिती अशी, कटरे यांनी 2007 मध्ये महिंद्रा ऍन्ड महिंद्रा फायनान्स सर्व्हीस लि. या कंपनीमधून ट्रॅक्‍टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर वर्षभर एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे कंपनीने वर्षानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ट्रॅक्‍टर ताब्यात घेतला. नंतर तो लिलावात विकला. कटरे यांच्याकडून कर्जाची रक्कम येणेबाकी होती. नोटीस पाठवूनही त्यांनी ती भरली नाही. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल केला. लवाद दाव्यामध्ये रक्कम वसुलीचा आदेश झाला. त्याप्रमाणे कंपनीने जिल्हा न्यायालयात लवाद दरखास्तप्रमाणे 4 लाख 38 हजार रूपये वसुलीसाठी कटरे आणि जामिनदार सीताराम पुजारी यांच्याविरूद्ध दावा दाखल केला. नोटीस मिळाल्यानंतरही कटरे यांनी रक्कम भरली नाही. त्यामुळे 2014 मध्ये जंगम मालमत्ता जप्तीसाठी वॉरंट काढले. 20 हजार रूपये जमा करून उर्वरीत रक्कम भरण्याचे आश्‍वासन कटरे यांनी दिले. रक्कम न भरल्यामुळे पुन्हा जप्ती वॉरंट काढले. परंतू जंगम मालमत्ता आढळली नाही. 

कंपनीचे वकील ऍड. राहुल पाटील यांनी कैद वॉरंट काढण्याची विनंती न्यायाधीशांना केली. न्यायाधीशांनी कटरे यांना कैद वॉरंटचा आदेश दिला. त्याप्रमाणे कटरे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. तरीही रक्‍कम भरली नाही. त्यामुळे तीन महिने कैदेची शिक्षा देऊन कारागृहात रवानगी केली.

Web Title: sangli news: arrest loan