सांगलीत ‘माऊली’चा जयघोष...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

शहर, जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत दर्शनासाठी रांगा
सांगली - ‘जय हरी विठ्ठल, जय... जय... विठ्ठल’च्या जयघोषात सांगली, मिरज शहर व जिल्ह्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा होत्या. स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाईसह फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. पहाटेपासून काकड आरती, विधिवत पूजा करण्यात आली. 

शहर, जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत दर्शनासाठी रांगा
सांगली - ‘जय हरी विठ्ठल, जय... जय... विठ्ठल’च्या जयघोषात सांगली, मिरज शहर व जिल्ह्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा होत्या. स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाईसह फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. पहाटेपासून काकड आरती, विधिवत पूजा करण्यात आली. 

गावभागातील विठ्ठल मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले. माधवनगर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पहाटे पासून भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पहाटेपासूनच गर्दी होती. एकादशीनिमित्त माधवनगरमध्ये उपवासाचे, खेळण्याचे स्टॉल लागले होते. मंदिर पसिरात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

मिरज शहरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा  झाला. विविध संस्था आणि शाळांनी दिंडी काढली. लक्ष्मी मार्केट परिसरात रिंगण केले.

बालगोपाळ दिंडी सोहळा समितीतर्फे उपक्रम झाले. मैदन दत्त मंदिरासमोरून पालखीची मिरवणूक सुरू झाली. जितेंद्र कुल्लोळी आणि मंजुषा कुल्लोळी यांनी पालखीपूजन केले. तांदूळ मार्केटमार्गे लक्ष्मी मार्केटमध्ये दिंडी आली. तेथे शाळकरी मुलांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. स्त्री-पुरुषांनी फुगडीचा फेर धरत भक्तीचा जागर केला. 

तेथून दिंडी हिंदमाता चौक, विद्यामंदिर शाळा, शिवनेरी चौक, ब्राह्मणपुरीमार्गे विजापूर वेशीतील विठ्ठल मंदिरासमोर आली. तेथे आरतीनंतर सांगता झाली. 

दिंडीमध्ये नूतन बालविद्यालय, ज्युबिली कन्याशाळा, सुरेशभाऊ खाडे विद्यालय, चैतन्य हास्ययोग मंडळ, प्रताप विद्यालय, आदर्श शिक्षण मंडळ, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी व संस्था सहभागी झाल्या. विविध देव-देवता व संत-महंतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडी आकर्षण ठरले. आमदार  सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वाटवे, राजेश देशमाने, प्रमोद घालवाडकर, रा. वि करमरकर उपस्थित होते.

दुधोंडी ग्रामदैवत हनुमान मंदिरासह श्री राम गोविंद देशमुख हॉलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराची स्वच्छता करून मंदिरावर विद्युत रोषणाईसह मंदिराला फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तीस नवीन वस्त्रे व फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी विठ्ठल दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

कांतिलाल शहा प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी बालदिंडीचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक पुंडलिक माने व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका परमजित कौर यांनी पालखीचे पूजन केले. दिंडीची  सुरवात प्रशालेच्या प्रांगणातून विलिंग्डन महाविद्यालयाच्या आवरातून काढण्यात आली.

Web Title: sangli news ashadhi ekadashi celebration