दंगली घडवण्याचे काम भाजपचेच - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सांगली - अच्छे दिनाचा नारा देणाऱ्या भाजप सरकारने आता जातीयवाद निर्माण करून मते मिळवण्याचे शेवटचे हत्यार भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपसले आहे. २००९ मध्ये दंगली घडवण्याचे काम भाजपनेच केले होते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केला. 

सांगली - अच्छे दिनाचा नारा देणाऱ्या भाजप सरकारने आता जातीयवाद निर्माण करून मते मिळवण्याचे शेवटचे हत्यार भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपसले आहे. २००९ मध्ये दंगली घडवण्याचे काम भाजपनेच केले होते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केला. 

काँग्रेसच्या ‘व्हिजन २०१९’ या शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, महापौर हारुण शिकलगार, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, विशाल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेसने ६० ते ७० वर्षांत अनेक चढउतार पाहिले. भाजपला काही सत्तेचा ठेका दिला नाही. लोक आता भाजपला कंटाळले आहेत. काँग्रेसने साखर कारखानदारी, बॅंका, रोजगार निर्मिती आदी सर्वकाही केले. भाजप म्हणजे आयत्या बिळावरचा  नागोबा आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचे काम सुरू केले आहे. उठसूट काँग्रेसच्या मागे लागले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे. आता सत्ता गेली तर काँग्रेस शिल्लक राहणार नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कर्जमाफी फसवी आहे. बहुमतामुळे विधानसभेत बोलू दिले जात नाही. अशा सरकारविरोधात झेंडे घेऊन रस्त्यावर उतरा. मंत्र्यांच्या गाड्या अडवा. परिस्थिती प्रतिकूल आहे,  म्हणून बसून चालणार नाही.’’

श्री. विखे-पाटील म्हणाले, ‘‘भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांनी दररोज लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. दररोज पाच लोकांना भेटून भाजप सरकार नालायक असल्याचे सांगा. सरकार नालायक असल्याचे लोकांना समजले आहे; परंतु ते त्यांच्यावर बिंबवा. राज्यात परिवर्तन घडवताना सांगलीने मोठी भूमिका बजवावी.’’

फायदा दोघांचा हवा !
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या शक्‍यतेबाबत श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘हा  निर्णय अद्याप झालेला नाही. स्थानिक नेतेच तो घेतील आणि आम्ही तो नंतर जाहीर करू. आता या जिल्ह्यातील नेते जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी पलूस-कडेगावसाठी विश्‍वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आघाडी दोघांनाही फायद्याची होईल तेव्हाच ती यशस्वी ठरते.’’

पालिकेत विजय हीच श्रद्धांजली
महापालिका निवडणुकीत काँग्रेस झेंडा फडकवला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सावध रहावे. काँग्रेसचा विजय हीच ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, मदन पाटील यांना खरी श्रद्धांजली असेल.

Web Title: Sangli News Ashok Chavan comment