‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र..’ - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केली.

सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केली.

महापालिका निवडणूक प्रचारानिमित्त ते येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संजय बजाज उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले,‘‘सत्ता राबवता येत नसेल तर खुर्चीवर बसता कशाला? मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. आंदोलन शांततेत व्हावे, त्याला गालबोट लागू नये, अशी भावना आहे. लोकांना आता चर्चेचे गुऱ्हाळ नको आहे. निर्णय हवा आहे. आरक्षणाबाबत कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढावा. त्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी. घटनेत बदलाची गरज असेल तर त्यासाठीची सर्वसंमतीने विहित प्रक्रिया राबवावी. पंढरपूरची वारी टाळणारे मुख्यमंत्री जनतेला तोंड दाखवू शकत नाहीत. कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेत. भरमसाट आश्‍वासने दिली. मात्र कृती नाही. मराठा आरक्षणाबाबत चार वर्षे वेळकाढूपणा करणारे सरकार आयोगाकडे निर्णय सोपवून वेळ मारून नेत आहेत.

न्यायालयातील प्रतिज्ञापत्रास विलंब लावला. खुद्द न्यायालयाने सरकारला फटकारले. सरकार काही करीत नसल्याने समाजाचा संयम सुटतोय. सत्ताधारींकडून बेताल वक्तव्ये करून आंदोलन भडकावण्याचे प्रयत्न झाले. साप सोडण्याच्या संभाषणाची टेप असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यांनी नावे घोषित करून कारवाई करावी.’’

निष्ठावंत शिवसैनिकांचे राजीनामे हाच उपाय 
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले,‘‘निष्ठावंत शिवसैनिकांचे राजीनामे हाच त्यावर उपाय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन  सत्तेत आलेल्या शिवसैनिकांनी जर राजीनामे दिले तर सरकार क्षणभर राहणार नाही. सरकार राहणार नाही या भीतीने तरी आरक्षणाचा निर्णय होईल आणि हाच यावर जालीम उपाय आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.

महापालिकेत आघाडीच
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘महापालिकेसाठी सामंजस्याने आघाडीचा निर्णय झाला. महापालिकेतील जनता आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आहे. सत्ता आघाडीचीच येईल. आगामी पाच वर्षांत शहरात चांगले काम होईल. काँग्रेसला इथे कोणतीही अडचण नाही. दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व नव्या पिढीकडे आले आहे. विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील ही टीम चांगले काम करीत आहे.’’

Web Title: Sangli News Ashok Chavan comment