गौरव नायकवडी यांच्या मोटारीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

इस्लामपूर - क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू आणि वाळवा गावचे माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्या चारचाकी गाडीवर इस्लामपूर येथे काल सायंकाळी सहाच्या सुमारास आष्टा नाका परिसरात हल्ला झाला. गेल्या आठ दिवसांपासून धुमसत असलेल्या एका किरकोळ कारणावरून इस्लामपूर येथील फाळकूटदादाने हा हल्ला केला. रात्री उशिरापर्यंत यावर पडदा टाकण्याचे काम सुरू होते. 

गौरव नायकवडी एका लग्नकार्यासाठी इस्लामपूर येथे आले होते. ते उरकून पेठ-सांगली रस्त्याने वाळव्याच्या दिशेने निघाले असता आष्टा नाका परिसरात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्लेखोर नायकवडी यांचे लोकेशन घेऊन या मार्गावर दबा धरून बसले होते. गेल्या आठ दिवसांपासून इस्लामपूर येथील काही युवक व वाळवा येथील नायकवडी समर्थकांत किरकोळ कारणावरून धुसफूस सुरू होती. यात गौरव नायकवडी यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर शनिवारी परत एकदा त्या युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचा राग मनात धरून इस्लामपूर येथील युवकांनी आज गौरव नायकवडी यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडून हल्लेखोर पसार झाले. 

हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराने इस्लामपूर शहरात यापूर्वी दोन ते तीन वेळा गंभीर मारामाऱ्या केल्या आहेत. मात्र, पोलिसांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले होते. 

आज त्या हल्लेखोराने गौरव नायकवडी यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी इस्लामपूर शहरात पसरली. काही राजकीय नेत्यांचा रात्री उशिरापर्यंत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. हल्ल्याची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी येथील वाळव्याकडून येणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त वाढवला. रात्री उशिरापर्यंत या हल्ल्याबाबत कोणतीही नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

Web Title: Sangli News attack on Gourv Naikwadi Motor