खैरावच्या उपसरपंचावर चोरट्यांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जत - चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या तिघा चोरट्यांनी खैरावचे उपसरपंच रामचंद्र पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. प्रसंगावधान राखून पाटील यांनी आरडाओरडा केल्याने सुदैवाने ते बचावले. ग्रामस्थांनी पळून जाणाऱ्या प्रकाश शिवाजी चव्हाण, रहाव्वा अर्जुन पवार (दोघेही रा. जत) व बादल बाळू शिंदे (रा. खडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या तिघा चोरट्यांचे हातपाय बांधून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

चारच दिवसांपूर्वी जत येथील व्यापारी प्रज्वल साळे यांच्या दुकानावर सहा जणांनी हल्ला केला होता, त्या वेळीही नागरिकांनी तिघा दरोडेखोरांना शस्त्रासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी खैराव येथे झालेल्या घटनेमुळे तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास खैरावजवळील टोणेवाडी येथील बेरगळ वस्तीवर चोरटे घुसले; पण तेथे त्यांना काहीच हाती लागले नाही. तेथे चोरटे घुसल्याची खबर खैराव ग्रामस्थांना मिळाल्याने काही ग्रामस्थ 

गस्त घालत होते. टोणेवाडी येथील डाव हुकल्याने चोरट्यांनी मोर्चा खैरावकडे वळविला. उपसरपंच रामचंद्र विठ्ठल पाटील यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न चोरटे प्रकाश शिवाजी चव्हाण, रहाव्वा अर्जुन पवार व बादल बाळू शिंदे यांनी केला. पाटील जागे झाल्याचे पाहताच या तिघांनी त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पाटील यांनी तो हल्ला चुकविला. आरडाओरड सुरू झाल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. याप्रकरणी रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी पकडले 
पाटील यांनी घटनेची माहिती नातेवाइकाना सांगितली. त्याचवेळी गावात गस्त घालणाऱ्या ग्रामस्थांनाही ही माहिती मिळाली. चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच खैराव येथील शाळेजवळ ग्रामस्थांनी तिघा चोरट्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ हत्यारे मिळाली. ग्रामस्थांनी चोरट्यांची धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Sangli News attack of theft in Khairav