कृष्णाकाठची माती, साहित्य कसदार - श्रीनिवास पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

अंकलखोप - कृष्णाकाठची माती आणि इथले साहित्य कसदार आहे. त्याची ताकद मोठी आहे. या मातीतूनच इंग्रजाविरुद्ध मोठे बंड उभे राहिले. शब्दांचे सोने करणारी माणसं या भागानं दिली, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे काढले. 

अंकलखोप - कृष्णाकाठची माती आणि इथले साहित्य कसदार आहे. त्याची ताकद मोठी आहे. या मातीतूनच इंग्रजाविरुद्ध मोठे बंड उभे राहिले. शब्दांचे सोने करणारी माणसं या भागानं दिली, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे काढले. 

औदुंबर (ता. पलूस) येथे म. भा. भोसले साहित्यनगरीत आयोजित सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अमृतमहोत्सवी सदानंद साहित्य संमेलन व पद्मश्री कवी सुधांशु जन्मशताब्दी अशा दुहेरी योगावर श्री दत्त चरणी माथा ठेवण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद श्री. पाटील यांनी व्यक्त केला. शाहीर पठ्ठे बापूराव, यशवंतराव चव्हाण, ग. दि. माडगूळकर, नारायण सुर्वे यांच्या प्रतिभेला सलाम करताना श्री. पाटील यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. 

ते म्हणाले,""कृष्णाकाठच्या साहित्यिकांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. कृष्णामाईच्या पाण्याप्रमाणे साहित्याचा प्रवाह अखंडित वाहतोय. शब्दाशब्दातून साहित्यात जादू निर्माण करण्याची ताकद इथे आहे. भारतीय लोकशाहीचा उगम 1291 सालीच झाला. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात "भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे' असे वर्णन केले आहे. साहित्यातील नोबेल मिळावे इतकी मोठी साहित्य संपदा आहे. बोलीभाषांसह विविध कलाप्रकारातून साहित्यात श्रवणीय काव्य, गीतांची भर पडली आहे. मोटेवरील, जात्यावरील गाणी महिलांना अपार कष्टातून विरंगुळा द्यायची. आजही ती गाणी रसिकांना भारावून टाकतात. समाज बदलाचे हे प्रभावी माध्यम असून त्याचा त्या पद्धतीने उपयोग झाला पाहिजे. त्याचे मोल लक्षात घेतले पाहिजे.'' 

राजकारणाने हानी 
डॉ. मिलिंद जोशी म्हणाले,""जुन्या काळातील राजकारणी विचारवंत, मोठे साहित्यिकही होते. आता राजकीय व्यक्तींचा साहित्याशी संबंध तुटला आहे. आज साहित्यात राजकारण शिरल्याने साहित्याची हानी झाली आहे.'' 

डॉ. जोशी म्हणाले,""सदानंद साहित्य संमेलन महाराष्ट्रातील एक मानदंड आहे. मराठी साहित्याचा इतिहास लिहिल्यास हे संमेलन महत्त्वाचे पान असेल. पूर्वी विद्वत्ता, सद्वर्तन, चरित्र यावर प्रतिष्ठा ठरते. सध्या बॅंक बॅलन्स, दिखाऊपणावर ठरते. दहा वर्षांत शतकाहून अधिक बदल झालेत. वरचा वर्ग स्टेट्‌स सांभाळण्यासाठी वेळ खर्च करतोय. खालचा वर्ग पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय. साहित्यातील एका वाक्‍याने माणसाचे आयुष्य बदलले आहे. एका कवितेने नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले. पुन्हा त्या बदलाची गरज आहे.'' 

खासदार पाटील म्हणाले,""लोकसहभागातून होणाऱ्या संमेलनाची परंपरा मोठी आहे. ही चळवळ यापुढेही मोठ्या प्रमाणात वाढत रहावी. समाजातील प्रश्‍न साहित्यातून मांडावेत. तशीच त्यांची उकलही व्हावी. कोणत्याही मोठ्या चळवळीला राजाश्रय असावा लागतो, मात्र येथे ग्रामीण भाग असूनही 75 वर्षे चालणारी ही साहित्यसेवा आदर्श आहे.'' 

सदानंद सामंत, कवी सुधांशु, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मंडळाचे उपाध्यक्ष शहाजी सूर्यवंशी यांनी स्वागत केले. गिरीश जोशी, प्रा. सुभाष कवडे यांनी परिचय करून दिला. अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ह. रा. जोशी यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. सरपंच अनिल विभूते, पोलिस पाटील सुनीता सूर्यवंशी यांचा सत्कार झाला. औदुंबर येथे विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, दिलीप वाग्यणी, जे. के पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मगदूम, उदयसिंह सूर्यवंशी, शामराव पाटील, घन:श्‍याम सूर्यवंशी, उपसरपंच मच्छिंद्र गडदे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ उपस्थित होते. वासुदेव जोशी यांनी आभार मानले. 
 

Web Title: Sangli News Audhumber Sahitya Sammelan