औदुंबर साहित्य संमेलनात घुमणार राज ठाकरेंचा आवाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

अंकलखोप - निसगरम्य कृष्णाकाठी औदुंबर येथे दत्तमंदिराच्या सानिध्यात सदानंद साहित्य मंडळाचे अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. 12) पासून तीन दिवस रंगणार आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे, साहित्यिक रामदास फुटाणे संमेलनाचा समारोपामध्ये उपस्थित राहणार आहेत.

अंकलखोप - निसगरम्य कृष्णाकाठी औदुंबर येथे दत्तमंदिराच्या सानिध्यात सदानंद साहित्य मंडळाचे अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. 12) पासून तीन दिवस रंगणार आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे, साहित्यिक रामदास फुटाणे संमेलनाचा समारोपामध्ये उपस्थित राहणार आहेत. आमदार पतंगराव कदम स्वागताध्यक्ष तर खासदार संजय पाटील निमंत्रक आहेत. 

यंदा मंडळाचे संस्थापक पद्मश्री कवी सुधांशू यांची जन्मशताब्दी आहे. तर संमेलनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. संमेलनातील कार्यक्रम तीन दिवस आहेत. शुक्रवारी (ता. 12) सकाळी 10.30 वाजता सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. खासदार संजय पाटील, माजी मंत्री पंगराव कदम, राज्य साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या सत्रात संमेलनात "संत साहित्य - काल, आज आणि उद्या' यावर चर्चा होईल. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे प्रमुख पाहुणे आहेत. प्रा. वैजनाथ महाजन अध्यक्षस्थानी आहेत. दीपक भागवत, अभय भंडारी, प्रा. राजा माळगी हेही उपस्थित राहणार आहेत. तृतीय सत्रात कविवर्य सुधांशू यांच्या गीतांचा कार्यक्रम रात्री 7 ते 8.30 आहे. शनिवारी (ता.13) प्रथम सत्रात बालकुमार साहित्य संमेलन सकाळी 10 वाजल्यापासून आहे. डॉ. राजीव तांबे अध्यक्षस्थानी आहेत. गोविंद गोडबोले, नीलम माणगावे, वर्षा चौगुले, रजनी हिरळेकर सहभागी होणार आहेत. निमंत्रितांचे काव्यवाचन दुपारी द्वितीय सत्रात आहे. कवि अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, महेश केळूसकर यांचा सहभाग आहे.

रविवारी (ता. 14) प्रथम सत्रात कविसंमेलन आहे. मंगसुळीतील आबासाहेब पाटील हे कविता सादर करणार आहेत. समारोपाच्या अध्यक्षस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील. वात्रटिकाकार रामदास फुटाणे प्रमुख पाहुणे आहेत. भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्‍वजित कदम उपस्थित राहणार आहेत. श्रीनिवास कुलकर्णी, शहाजी सूर्यवंशी, अनिल विभूते, अंकलखोप ग्रामपंचायतीतर्फे संयोजन सुरू आहे. 

Web Title: Sangli News Audumbar Sahitya Sammelan