रिक्षाचालकाची तक्रार करा ‘व्‍हॉटस्‌ ॲपवर...’

शैलेश पेटकर 
बुधवार, 7 जून 2017

सांगली - प्रवासी नाकारणे, मीटरनुसार भाडे न आकारणे व प्रवाशांशी उद्धटपणे वागणे.. आपल्या दररोजच्या प्रवासात अशा काही गोष्टी आढळल्या, तर संबंधित रिक्षाचालकाची तक्रार आता व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून पाठवूनही करता येऊ शकते. प्रवाशांसाठी ही सुविधा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केली आहे. मुंबई-पुण्यानंतर आता प्रथमच ही सुविधा सांगलीकरांसाठी खुली करण्यात येत आहे. 

सांगली - प्रवासी नाकारणे, मीटरनुसार भाडे न आकारणे व प्रवाशांशी उद्धटपणे वागणे.. आपल्या दररोजच्या प्रवासात अशा काही गोष्टी आढळल्या, तर संबंधित रिक्षाचालकाची तक्रार आता व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून पाठवूनही करता येऊ शकते. प्रवाशांसाठी ही सुविधा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केली आहे. मुंबई-पुण्यानंतर आता प्रथमच ही सुविधा सांगलीकरांसाठी खुली करण्यात येत आहे. 

शहरातील अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आहेत. मात्र, तितक्‍याच प्रमाणात काही चालकांकडून काही गैरप्रकारही केले जातात. याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अनेक तक्रारी येतात.  जिल्ह्यातील साडेआठ हजार रिक्षाचालकांच्या वर्तनाचा कार्यालयाकडून अभ्यास करण्यात  आला. सातत्याने येणाऱ्या एकाच प्रकारच्या तक्रारी लक्षात घेता  संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आला. ठरावीक ठिकाणी जाण्यास प्रवाशाला नकार देणे,  प्रवाशांशी सौजन्यभाव न ठेवता उद्धटपणे वागणे त्याचप्रमाणे मीटरनुसार भाडे न घेता मनमानी पद्धतीने भाड्याची आकारणी करून प्रवाशांची लूट करणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी रिक्षा चालकांच्या बाबतीतही प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन संबंधितांविरुद्ध लेखी तक्रार आल्यास त्या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येते. लेखी तक्रारीबरोबरच आता वॉटस्‌ॲपच्या माध्यमातूनही ही तक्रार केल्यासही  संबंधित चालकावर कारवाई करण्यात येत आहे.

कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींची आम्ही सत्यता पडताळून पाहण्यासाठी सांगली-मिरज शहरात ७८ ठिकाणी पंचनामे केले. त्यात ९० टक्के लोक मीटरनुसार भाडे आकरणी करत नाहीत. चालकांची उद्धटपणे वागणूक दिसून आली. म्हणून नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी व्हॉटस्‌ ॲप क्रमांक देण्यात आला आहे. त्याचा लाभ घ्यावाच. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चालकांची कर्तव्ये सर्वांना समजून सांगितली पाहिजेत. ही मोहीम येणाऱ्या काळात आणखी तीव्र करणार आहोत. नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली.  

अशी करा तक्रार 
प्रवाशांची तक्रार असल्यास त्याबाबत ९६०४८१३९३९ या व्हॉटस्‌ ॲप क्रमांकावर मेसेज पाठविता येणार आहे. त्यात रिक्षा क्रमांक, शक्‍य झाल्यास फोटो आणि तक्रार टाकावी. त्याची सत्यता पडताळून संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाईल.

कारवाई काय?
व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीची तत्काळ पडताळणी केली जाणार आहे. त्यातून संबंधित चालकाचा बेजबाबदारपणा दिसून आला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कारवाईत संबंधित रिक्षाचालकाचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित केला जातो किंवा दंडात्मक कारवाई केली जाते.

Web Title: sangli news autorickshaw whatsapp

टॅग्स