विटा नगरपालिकेच्या कंपोस्ट खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र

प्रताप मेटकरी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

नगरपालिकेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला राज्य शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र मिळवणारी विटा नगरपालिका ही राज्यातील चौथी तर सांगली जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे. 

विटा - विटा नगरपालिकेने शहरात संकलित होणाऱ्या घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधील ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले कंपोस्ट खताला हरित महा सिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज (ता. 28) मुंबईत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात झाले. 

विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांना प्रदान करून विटा पालिकेला गौरविण्यात आले.

नगरपालिकेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला राज्य शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्डचे प्रमाणपत्र मिळवणारी विटा नगरपालिका ही राज्यातील चौथी तर सांगली जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे. विटा शहरातील घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधील ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत कृषी विभागाच्या प्रयोगशाळेमधून तपासून घेऊन राज्य शासनाच्या हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड वापरण्यास परवानगी मागितली होती.

त्यानुसार राज्य शासनाच्या हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड विटा शहरातील विलगीकृत केलेल्या विघटनशील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या खताची विपणन व विक्री करण्यासाठी राज्यातील विटा, सासवड, सावनेर, कळमेश्वर या नगरपालिकांना परवानगी देण्यासाठीचे प्रमाणपत्र आज (ता. 28) मुंबईत मंत्रालयातील मुख्यमंत्र्याच्या समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, नितीन करीर उपस्थित होते.

शहरात तयार होणाऱ्या ओला कचऱ्याचे प्रक्रिया करून खत निर्मिती करताना त्याचा दर्जा निर्माण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विटा, सासवड, सावनेर आणि कळमेश्वर या चार नगरपालिकांना यश आले आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकमेव विटा शहर प्रथम क्रमांकाने पुढे आले आहे. 

विटा पालिकेच्या कंपोस्ट खताला राज्य शासनाने हरित महा ब्रॅण्डचे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. भविष्यात ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा विटा पालिकेचा मानस आहे. शहरातील पथदिवे या विजेवर चालवता येतील का ? याचा अभ्यास सुरू आहे. कचऱ्यातून विलगीकरण केलेल्या प्लॅस्टिकचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी करणार आहे.

 - प्रतिभा पाटील,  नगराध्यक्षा

विटा नगरपालिकेच्या कंपोस्ट खताला हरित ब्रॅण्ड मिळणे हे विटा नगरपालिकेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. पालिकेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला हरित महा ब्रॅण्ड मिळाल्यामुळे खत बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. प्रति टन 1500 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
- महेश रोकडे,
 मुख्याधिकारी

Web Title: Sangli News award to Vita corporation