विसापूरमध्ये सात महिन्यांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा

विसापूरमध्ये सात महिन्यांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा

तासगाव - विसापूर (ता. तासगाव) येथे अवघ्या सात महिन्यांचा आर्यन चव्हाण याचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी त्याच्या आई-वडिलांसह आजी-आजोबांवर तासगाव पोलिसांनी आज खुनाचा गुन्हा दाखल केला. या चौघांनाही अटक केली आहे. आईनेच मुलाचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसही हादरून गेले. हा प्रकार रविवारी (ता. २५) रात्री घडला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी याचा छडा लावला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी  विसापूर येथील अर्जुन भीमराव चव्हाण आणि सुनीता यांचा विवाह २२ नोव्हेंबर २०१६ ला झाला. त्यांना २ सप्टेंबर २०१७ ला मुलगा झाला. सध्या सुनीता विसापूर येथे सासरी राहत होती. सुनीता गरोदर असल्यापासून पती अर्जुन, सासरा भीमराव, सासू आनंदी संशय घेत होते.

मुलगा झाल्यानंतरही चव्हाण कुटुंबीय सुनीताच्या माहेरी बारशालाही गेले नव्हते. सुनीता जानेवारीत विसापूरला आली; मात्र सासरच्या मंडळींनी आर्यनला स्वीकारले नाही. ‘हे मूल कुणाचे आहे, ते अर्जुनसारखे दिसत नाही,’ असे म्हणून सतत संशय घेत होते. ‘आर्यनला तुझे तू मारून टाक; नाही तर पहिल्यांदा तुला आणि नंतर तुझ्या आई-वडिलांनाही खलास करणार,’ अशी धमकी पतीसह सासू-सासरे वारंवार देत होते. सासरा भगवान चव्हाण याने तर एक दिवस आर्यनला एक पाय धरून उलटे करून खाली सोडण्याचीही; तर सुनीताला गळा वायरने बांधून पंख्याला लटकवण्याची धमकी दिली होती. 

सुनीताचे सासू-सासरे, नणंद २५ फेब्रुवारीला पुणदी येथे पाहुण्यांकडे गेले होते. त्या वेळी सायंकाळी पाचच्या सुमारास पती अर्जुन घरात आला आणि ‘घरातील साऱ्यांना बाहेर पाठविले आहे. आज तुझा शेवट आहे, तू आर्यनला खलास कर! नाही तर तुला मी खलास करतो,’ असे म्हणून प्रचंड मारहाण केली. त्या भीतीने सुनीताने आर्यनच्या गळ्याला हात घातला; मात्र ती मारू शकली नाही, हे पाहून अर्जुनने पुन्हा मारहाण करण्यास सुरवात केली. ‘तुझ्या आई-वडिलांनाही मारून टाकणार,’ असे म्हणून पुन्हा मारहाण करू लागला. पतीचा अवतार बघून आर्यनला नवरा आपला मुलगा मानत नाही आणि आपल्या आई-वडिलांचा जीव वाचवायचा, असे म्हणून सुनीताने आर्यनचा गळा दाबून खून केला. अर्जुनने आर्यनला पाळण्यात ठेवण्यास सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर घरातील सर्वजण आल्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. 

तेवढ्यात भावकीतील कोणीतरी सुनीताच्या वडिलांना दुधोंडीला दूरध्वनी करून नातवाचा मृत्यू झाल्याचे कळविले. आर्यनचे आजोबा दिनकर रामचंद्र तांबवेकर (रा. दुधोंडी) विसापूर येथे आले. त्यांनी नातवाचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांची चक्रे फिरली आणि खुनाचा प्रकार समोर आला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी या प्रकरणी चौघांविरोधात खुनाची फिर्याद दिली आहे. चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता अर्जुन आणि भीमराव चव्हाण यांना १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी, तर सुनीता आणि सासू आनंदी चव्हाण यांना १३ मार्चपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली. 

खाकी वर्दीही गहिवरली
पोलिसांनी अतिशय हुशारीने या प्रकाराचा तपास केला. संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच आर्यनचा मृतदेहाच्या गळ्यावरील खुणा पाहिल्यानंतर खुनाच्या संशयाला पुष्टी मिळाली. मात्र खून नक्‍की कोणी केला, याबाबत अर्जुन आणि सुनीता एकमेकांवर आरोप करीत होते. पोलिसी खाक्‍या दाखवूनही अर्जुन माहिती देत नव्हता. शेवटी सुनीतानेच मला वाचवा म्हणून खुनाची कबुली दिली. मात्र, घडलेला घटनाक्रम पाहून खाकी वर्दीही गहिवरली. सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, राजेंद्र चोरवडे, हेमंत ओमासे, विलास मोहिते, हवालदार माने यांच्यासह पथकाने अवघ्या काही तासांत गुन्हा उघडकीस आणला.

माकडिणीची कथा
अतिशय हृदयद्रावक आणि दगडाला पाझर फुटणाऱ्या या घटनेत ‘‘हे मूल माझे नाही, त्याला मारून टाक ! ’असे म्हणून मुलाच्या बापाने पाळण्यातील मुलगा आर्यनचा गळा दाबण्यास आईला भाग पाडले. नाका-तोंडात पाणी जाऊ लागल्यानंतर आपल्या बाळाला पायाखाली घेणाऱ्या माकडिणीची कथा आठवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com