खराब टायर...आयुष्यातून रिटायर!

शैलेश पेटकर
रविवार, 20 मे 2018

‘टायर फुटून गाडीचा अपघात’ अशा दुर्घटना सातत्याने घडतात. का फुटतो टायर? का जाताहेत किरकोळ दुर्लक्षाचे बळी, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. केवळ चारचाकी चालविता येणे पुरेसे नाही, तिची देखभाल आणि वेळोवेळी दुरुस्ती गरजेचीच आहे. खराब टायर आयुष्यातून रिटायर करू शकतो, हे अनेक अपघातांतून दिसून आले आहे. 

पुणे-सोलापूर महामार्गावर कारचे टायर फुटून एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. अशा अनेक घटना सतत घडताहेत. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी टायरची तपासणी गरजेची आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अगदी घरगुती वाहन असो किंवा भाड्याने देण्यासाठीचे... किरकोळ दुर्लक्ष जीवघेणे ठरतेय. 

टायर बदला 
रस्त्याला स्पर्श करणाऱ्या टायरच्या पदराचा आकार अंदाजे एक मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी झाला असल्यास टायर त्वरित बदलावेत. राष्ट्रीय महामार्गावर जास्त प्रवास होणाऱ्या वाहनांचे टायर निश्‍चित किलोमीटरनंतर किंवा पाच वर्षांनी बदलावेच. 

अलाइन्मेंट-बॅलेन्सिंग 
खराब रस्त्यांवरून प्रवास होत असेल तर पाच हजार किलोमीटरनंतर व्हील अलाइन्मेंट आणि व्हील बॅलेन्सिंग करून घ्यावे. रिम चांगले, नव्या पद्धतीचे असणाऱ्या वाहनांना ट्युबलेस टायर वापरावे. रिम खराब असेल तर ते धाडस नको. टायर-ट्यूबही दर्जेदारच असतात. 

सुरक्षित प्रवासासाठी वाहनाच्या इंजिनइतकीच काळजी टायरची घेतली पाहिजे. एकवेळ इंजिन बंद पडले तर फार नुकसान नाही, मात्र टायर फुटले तर जीवाला धोका असतो. टायर बदलायला वेळकाढूपणा करू नका.
- संजीव पाटील,
संचालक, राज एंटरप्रायझेस

तत्काळ दाखवा...
टायर कधीच अचानक फुटत नाही. तो इशारा देतो. एखादा छोटा फुगा धोका दर्शवतो. त्या वेळी टायर बदलाच. अन्यथा, धोका अटळ आहे. टायरची एक बाजू फाटून धागे दिसत असतील तर तेही धोकादायक आहे. 

गाडी सातत्याने वेगात चालवली जात असेल तर टायरचे आयुष्य कमी होऊ शकते. वेगाने चालवल्याने टायर गरम होऊन पंक्‍चर होण्याची, फुटण्याची शक्‍यता असते. उत्तम दर्जाचे टायर वापरा. त्यात बचत गरजेची नाही.
- सुशांत हमीदवाड, 

संचालक, दिलीप टायर्स

Web Title: Sangli News Bad tires ... retire from age!