ढगाळ हवामानाने सांगलीत द्राक्ष बागायतदारात चिंता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सांगली - जिल्ह्यात ढगाळी वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरींमुळे द्राक्ष, शाळू उत्पादक शेतकऱ्यांचे आज धाबे दणाणले. हंगाम सुरवातीपासूनच निसर्गाच्या विचित्र कचाट्यात सापडलेला द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

सांगली - जिल्ह्यात ढगाळी वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरींमुळे द्राक्ष, शाळू उत्पादक शेतकऱ्यांचे आज धाबे दणाणले. हंगाम सुरवातीपासूनच निसर्गाच्या विचित्र कचाट्यात सापडलेला द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

यंदाची थंडी वाढल्यामुळे दराच्या फटक्‍यात आजपासून आठवडाभर ढगाळी वातावरणांने व्यापाऱ्यांचा कल दर कमी करण्याकडे राहणार आहे. वर्षभर पोटच्या पोरांपेक्षाही अधिक जोपासना केलेले पीक मातीमोल दराने विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. थंडी कमी झाली तर ढगाळ हवामानाने शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकांसाठी गुंतवलेली रक्कमही निघेल का यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

जिल्ह्यात एक लाख 20 हजार एकरांवर द्राक्षबाग आहे. त्यातील 30 टक्के बागा खराब हवामानामुळे यापूर्वीच बाद झाल्या आहेत. 35-40 टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे. तर उर्वरित 35 टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. विशेष म्हणजे मार्च अखेर जिल्ह्यातील हंगाम लांबणार आहे. खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भूरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर 170 ते 180 रुपये मिळतो आहे. शेतकऱ्याची कोंडी करून गुंतवलेल्या रकमेएवढाही पैसा त्यांच्या पदरात पडू दिला जात नाही. चांगल्या दर्जाच्या मालही कमी दराने खरेदी केला जातो आहे. तर खराब मालाला यापेक्षा कमी दर मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

रब्बी हंगामातील शाळू ज्वारीचे क्षेत्र 70 ते 75 हजार हेक्‍टर आहे. सध्या काढणी, खोडणी, मळणी आणि चारा गोळा करण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. आगाप ज्वारीची काढणी झाली असली तरी कडबा बांधणी व गोळा करण्याची कामे अपूर्ण आहेत. 50 टक्के शेतकऱ्यांचा काढलेला शाळू शेतात पडला आहे. अशातच ढगाळ हवामान आणि हलक्‍या सरींमुळे शाळू ज्वारीच नव्हे तर कडबाही काळा पडण्याची सर्व शेतकऱ्यांनाच धास्ती आहे. येत्या चार दिवस अशाच अंदाजाने अनेक शेतकरी शाळू खोडणी व मळणीच्या धांदलीत आहेत. 

पुढील पाच-सहा दिवस ढगाळ हवामान आणि वातावरणातील बदल पहायला मिळेल. निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगामाच्या सुरवातीपासून द्राक्ष शेती अडचणीत आहे. थंडीत दर कमी होते. सध्याच्या ढगाळी हवामानात पुन्हा दलालांकडून दर पाडले जात आहेत. उत्पादन खर्चाचा ताळमेळही जमत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 
- सुभाष आर्वे,
अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

जिल्ह्यात रविवार-सोमवारपर्यंत खराब हवामान राहण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पाडव्यापर्यंत चांगले वातावरण आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी अतिवाईट वातावरण आहे. यंदा सर्वप्रथमच थंडी बराच काळ टिकल्याने फेब्रुवारीतही चांगले दर मिळाले नाहीत. थंडी कमी होत असतानाच ढगाळी वातावरण झाले आहे. शेतकऱ्यांच्या द्राक्ष शाळू ज्वारीच्या दरात विक्रीची वेळ आली आहे. संकटामागून संकटांचा सामना शेतकरी करताहेत. विशेष म्हणजे शासनाच्या कवडीमोल मदतीशिवाय उत्पादन घेतले जात असतानाही द्राक्ष दलालांकडून फसवणूक सुरू झाली आहे.'' 
- एन. बी. म्हेत्रे,
द्राक्षतज्ज्ञ 
 

Web Title: Sangli News bad weather affects Grape rate