बांगलादेशी तरुणींमुळे ‘रेडलाईट’मध्ये ठिणगी ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

सांगली - कर्नाटकातील देवदासी प्रथा बंद झाल्यानंतर ‘रेड लाईट’ एरियात नेपाळी, बांगलादेशी  आणि पश्‍चिम बंगालमधील तरुणींचा प्रभाव वाढला आहे. या संधीचा नेमका फायदा उठवत उत्तर भारतीय दलालांनी येथे ‘घरवाली’ना हाताशी धरून तरुणींना आसरा दिला आहे. काही तरुणींनी भाड्याने घरे देऊन सांगली, मिरजेत बस्तान बसवले आहे. त्या खुलेआम वेश्‍या व्यवसाय करत आहेत. 

सांगली - कर्नाटकातील देवदासी प्रथा बंद झाल्यानंतर ‘रेड लाईट’ एरियात नेपाळी, बांगलादेशी  आणि पश्‍चिम बंगालमधील तरुणींचा प्रभाव वाढला आहे. या संधीचा नेमका फायदा उठवत उत्तर भारतीय दलालांनी येथे ‘घरवाली’ना हाताशी धरून तरुणींना आसरा दिला आहे. काही तरुणींनी भाड्याने घरे देऊन सांगली, मिरजेत बस्तान बसवले आहे. त्या खुलेआम वेश्‍या व्यवसाय करत आहेत. 

ही साखळी शहरात मोठ्या प्रमाणात देहविक्रीच्या व्यवसायाला खतपाणी घालतेय. काही व्हाईट कॉलर लोकांचा त्यात थेट संबंध असल्याची माहिती पुढे येत  आहे. राजकीय नेत्यांसह पोलिसांचे पाठबळावर हा नवा पट मांडला जात आहे. त्याविरुद्ध तक्रारीनंतर कारवाईचा फार्स केला जातोय. या घुसघोरीने व्यवसायावरील प्रभुत्वाची नवी स्पर्धा सुरू झाली असून त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडली आहे. व्यवसायात दीर्घकाळ काम करणाऱ्या एका महिलेने या वृत्ताला दुजोरा दिला. 

सांगली, मिरजेत गेल्या आठवड्यात कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. बांगलादेश, पश्‍चिम  बंगालमधील तरुणींची सुटका केली. एका संघटनेच्या तक्रारीनंतर कारवाई केली. मुळात या तरुणींची संख्या एक-दोन इतकी अल्प नक्कीच नाही. कर्नाटकातून येथे येऊन अनेक वर्षे वस्तीत राहणाऱ्या महिलांच्या बरोबरीने नेपाळी, बंगाली तरुणींची संख्या आहे. त्यात बांगलादेशी चेहरे झाकून जाताहेत. त्याला खोट्या ओळखपत्रांचा आधार मिळत आहे, मात्र त्यातून आता संघर्ष पेटू लागला आहे. या व्यवस्थेवरील वर्चस्ववाद सतत डोके वर काढत आहे.

कर्नाटकात मोठा बदल
देवदासी प्रथेविरुद्ध मोठ्या जनआंदोलनानंतर कर्नाटकातून या प्रथेचे जवळपास उच्चाटन होत आले आहे. तेथील तरुणांनी त्याविरुद्ध बंड केले असून असा प्रकार कुणी केला तर थेट एक लाख, दोन लाख रुपयांचा दंड  संबंधित कुटुंबांना लावला जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वेश्‍या व्यवसायातील देवदासींचे प्रमाण नगण्य  आहे. 

नेपाळींचा प्रभाव
सांगलीतील सुंदरनगर (काळी खण), गोकुळनगर, मिरजेतील प्रेमनगर या तीन वेश्‍यावस्ती आहेत. तेथे नेपाळी तरुणींचा प्रभाव वाढला आहे. नेपाळमधून भारतात यायला पासपोर्ट, व्हिसा लागत नाही. त्यामुळे हा व्यवहार सहज होतो आहे, असे या क्षेत्रातील एकाने सांगितले. यात आता बांगलादेशी चेहरे दिसू लागले आहे. त्यांना ओळखणे सहज शक्‍य नाही. शिवाय, बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार कार्ड बनवून त्यांचे येथेच बस्तान बसवले जात आहे.  

पोलिसांचेही उखळ पांढरे
रेडलाईट एरियातील उलाढाली पोलिसांच्या छुप्या मान्यतेनेच होतात. त्यांचे उखळ पांढरे होते. ‘पिटा’ कायद्याखाली कारवाई करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपास करावा लागतो. त्यांना उच्च न्यायालयात खेटे मारावे लागतात. त्यामुळे ते अशा कारवाईकडे दुर्लक्ष करतात.

Web Title: Sangli News Bangladeshi Girls in Red-light area