बेदाण्याची पट्टी २१ दिवसांत; सौद्यातील उधळण थांबणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सांगली - बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्णय बैठकीत सभापती प्रशांत शेजाळ यांनी घेतला. बेदाणा बॉक्‍सच्या पैशाबाबत राज्यातील पाच बाजार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले.

सांगली - बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्णय बैठकीत सभापती प्रशांत शेजाळ यांनी घेतला. बेदाणा बॉक्‍सच्या पैशाबाबत राज्यातील पाच बाजार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले.

बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी, शेतकरी यांची आज संयुक्त बैठक झाली. या वेळी सभापती प्रशांत शेजाळ, सचिव प्रकाश पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संजय बेले, संदीप राजोबा, व्यापारी प्रतिनिधी सुशील हडदरे, राजेंद्र कुंभार, प्रशांत पाटील-मजलेकर, तसेच शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानीने बेदाण्याला हमीभाव मिळावा, बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत पेमेंट करावे, सौदे करत असताना बेदाण्याची उधळण थांबावी, आदी मागण्या बाजार समितीकडे केल्या होत्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक झाली.  

सभापती शेजाळ म्हणाले, ‘‘बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट करावे, अशा व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. विलंबाने पेमेंट झाले तर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ज्याप्रमाणे बाजार समितीमध्ये हळद संशोधन केंद्र आहे, त्याच धर्तीवर बेदाण्याचे संशोधन केंद्र उभे करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल. त्यामुळे बेदाण्यात वापरण्यात आलेले गंधकाचे प्रमाण समजण्यास मदत होईल. त्यामुळे बेदाण्याला दर वाढेल.’’

सभापती शेजाळ म्हणाले, ‘‘शीतगृहावर बेदाण्याचे सौदे होतात; मात्र यामध्ये मोठ्याच शेतकऱ्यांच्या बेदाण्याला अधिक दर मिळतो. यावर बाजार समितीने नियंत्रण करावे, अशी मागणी केली आहे. त्यानुसार शीतगृहाचे अध्यक्ष यांच्याशी लवकरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार आहे. त्याचप्रमाणे बेदाणा बॉक्‍सचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत. याबाबत सांगली, तासगाव, पिंपळगाव, पंढरपूर या बाजार समिती एकत्र येऊन त्याबाबतची बैठक १ सप्टेंबरला घेतली जाईल.’’

‘‘बेदाणा, हळद हा शेतीमाल आहे. बेदाणा आणि हळदीला केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे. त्यामुळे याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जीएसटी वगळण्यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार आहे. ९ सप्टेंबरला हैदराबाद येथे जीएसटीबाबत एक बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला बाजार समितीचे पदाधिकारी जाणार आहेत. त्यात बेदाणा आणि हळदीवरील जीएसटी वगळा, अशी मागणी केली जाईल.’’
- प्रशांत शेजाळ, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती. 

Web Title: sangli news bedana amount paid in 21 days