कलाकरांकडे जिद्द, हरहुन्नरीपणा अन्‌ सर्जनशीलता हवी - मोहन जोशी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सांगली - आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. नव्या कलाकारांना झटपट यशाची अपेक्षा असते, त्यामुळे अपयश येते. कलाकारांना जिद्द, हरहुन्नरीपणा अन्‌ सर्जनशीलतेनेच यशाचा मार्ग मिळतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आज व्यक्त केले. 

सांगली - आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. नव्या कलाकारांना झटपट यशाची अपेक्षा असते, त्यामुळे अपयश येते. कलाकारांना जिद्द, हरहुन्नरीपणा अन्‌ सर्जनशीलतेनेच यशाचा मार्ग मिळतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आज व्यक्त केले. 

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे रंगभूमी दिनी आज विष्णुदास भावे गौरवपदक देऊन श्री. जोशी यांना गौरविण्यात आले. विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या समारंभात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. श्री. जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी, निर्मला सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. जोशी म्हणाले, ""नाटक, चित्रपट, नातेवाईकांच्या भेटीसाठी अनेकदा सांगलीत आलो. दोन दिवस मी सांगलीतच आहे. आज या व्यासपीठावर येताना छातीत धडधड होती. या पदकाने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. वीज संचारावी तसे मी भारावून गेलो. भावे पुरस्काराच्या यादीत आता जयंत सावरकर यांच्यानंतर माझे नाव येणार असल्याने मी साशंक होतो. पण, निवड समितीने माझी एकमताने निवड केली. काही वर्षांत चांगले काम केले असावे, म्हणूनच माझी या पुरस्कारासाठी निवड केली. विष्णुदास भावे हे जिद्दी, हरहुन्नरी होते. त्यांच्यातील काही गुण माझ्यातही आहेत. जिद्दीने काम केल्यास ते व्हायलाच हवे, अशी माझी धारणा आहे. भावेंनी हौशी रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्याकडील जिद्द, हरहुन्नरी व सर्जनशीलता आजच्या नवकलाकारांनी अंगीकारली पाहिजे.'' 

नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले व नांदी सादर केली. त्यानंतर रामभाऊ चिपळूणकर यांनी रचलेले विष्णुदास भावे गौरवगीताचे सादरीकरण झाले. अंकिता आपटे, यशश्री जोशी, गायत्री कुलकर्णी, कोमल कुलकर्णी, आधीश तेलंग यांचा समावेश होता. 

नियोजन समितीचे विनायक केळकर, मेधा केळकर, व्ही. जे. ताम्हणकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, बलदेव गवळी, बीना साखरपे उपस्थित होते. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी आभार मानले. 

मोहनरावांना पोरके करू नका - सावरकर 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले मोहन जोशी लवकरच परिषदेचे नेतृत्व सोडणार आहेत, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी त्यांच्या भाषणातून केला. ते म्हणाले, ""मोहनरावांच्या मनात सध्या नाट्यपरिषदेला सोडण्याचा विचार आहे. नाट्यपरिषदेतील या वादात कलावंतांना पोरके करू नका.'' 

पुरस्काराने जोशी गहिवरले 
मानाचे विष्णुदास भावे पदक मिळाल्यानंतर मोहन जोशी गहिवरले. विष्णुदासांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी भावे नावाशी असणारी जवळीकताही सांगितली. ते म्हणाले, ""माझ्या वडिलांचे नाव विष्णू आणि आईच्या माहेरील आडनाव भावे आहे. त्यामुळे विष्णुदास भावे नावाशी माझी जवळीकता आहे.'' 
 

Web Title: Sangli News Bhave Award to Mohan Joshi