'MTE'चे भाजपरंग : खासदार संजय पाटील नवे अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सर्व अडथळे दूर होतील - खासदार पाटील​

"वालचंद महाविद्यालयासाठी वालचंद ट्रस्टने दिलेले योगदान आणि त्यामधील स्पष्टता यापूर्वीच झाली आहे. मात्र काही मंडळींनी सौजन्याचा फायदा घेत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण कलुषित केले आहे. मात्र आता हे सर्व अडथळे दूर होतील.

सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची निवड झाली आहे. आज त्याचा उच्चार वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभात करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार पाटील यांनी वालचंद महाविद्यालयाच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

पुणेस्थित एमटीई सोसायटीच्या संस्थेच्या मालकीवरून सध्या न्यायालयीन स्तरावर वाद सुरू आहे. सचिव श्रीराम कानिटकर यांच्या गटाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सध्या कार्यरत आहेत. त्याचवेळी आता अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी राजीनामा देऊन खासदार पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. संस्थेचे पुण्यात होमिओपॅथी महाविद्यालय असून सांगलीत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकीचा दावा देशमुख गटाने केला असून आता या वादाला खासदार पाटील यांच्या निवडीने दोन्ही बाजूने भाजप अंतर्गत संघर्षाचा राजकीय रंग मिळाला आहे. 

यावेळी उद्योजक अजित गुलाबचंद, वालचंदच्या माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी श्रीनिवास पाटील, दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, हेमंत अभ्यंकर आदी उपस्थित होते. मध्यंतरी उद्‌भवलेल्या घोडके समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असून त्यात वालचंद महाविद्यालयाच्या नियामक मंडळाच्या अधिकाराबाबत स्पष्ट खुलासा करण्यात आला असून शासनस्तरावर संभ्रमावस्था संपली असल्याचा दावाही त्यांनी केला. 
एमटीई सोसायटीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी राजीनाम दिला असून त्या जागी खासदार पाटील यांची निवड झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

खासदार पाटील म्हणाले, "वालचंद महाविद्यालयासाठी वालचंद ट्रस्टने दिलेले योगदान आणि त्यामधील स्पष्टता यापूर्वीच झाली आहे. मात्र काही मंडळींनी सौजन्याचा फायदा घेत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण कलुषित केले आहे. मात्र आता हे सर्व अडथळे दूर होतील. शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या घोडके समितीचा अहवालही स्पष्ट आहे. मात्र काही कारणास्तव तो शासनाने प्रसिध्द केलेला नाही. अनेक न्यायालयीन प्रकरणांमुळे त्यावर तुर्त कोणतेही भाष्य करणे योग्य नाही मात्र एक निश्‍चित की महाविद्यालयाच्या प्रगतीत यापुढे कोणतेही अडथळे येणार नाहीत.'' 

हेमंत अभ्यंकर म्हणाले, "महाविद्यालयाचे 40 हजार माजी विद्यार्थी नियामक मंडळासोबत आहे. ते महाविद्यालयासाठी तन, मन, धनाने योगदान देत आहेत. यापुढेही आम्ही ते देऊ.'' 

Web Title: Sangli News BJP MP Sanjay Patil MTE president