Bala-Nandgaonkar
Bala-Nandgaonkar

भाजपला नकार देणाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा - बाळा नांदगावकर

सांगली - भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब केला जात आहे. जे कोणी पक्षात येत नाहीत त्यांच्यामागे इनकम टॅक्‍स, ईडी, सीबीआयसारखी चौकशीचा ससेमिरा लावला जातो असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, 'गुढी पाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात टीम पाठवून मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष झाले हे कबूल करतो. ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांना बळ दिले गेले नाही. वेळीच बळ दिले असते तर आणखी मजबूत संघटन दिसली असते. पुन्हा हे घडू नये म्हणून दौरे सुरू आहेत. दौऱ्यात कार्यकर्त्यांनी बोचऱ्या, टीकात्मक सूचनांसह मौलिक मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोनातून भविष्यात वाटचाल केली जाईल. भाजप आज दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन ढोल वाजवत आहे. परंतु हे जास्त काळ चालणार नाही.'' 

श्री. नांदगावकर म्हणाले, 'भाजपकडून पक्ष वाढवण्यासाठी साम, दाम आणि दंड नीतीचा वापर केला जात आहे. जे कोणी पक्षात येत नाहीत, त्यांच्यामागे इन्कम टॅक्‍स, ईडी किंवा सीबीआय सारख्या चौकशा लावल्या जातात. सत्तेसाठी पक्षापक्षात भांडणे लावण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू आहे. देशाला अराजकतेकडे नेण्याचे काम सुरू आहे. सत्तेत असलेली शिवसेना फक्त बोलायचेच काम करते. विरोधी पक्ष दुर्दैवाने कोठे दिसत नाही. मोदीमुक्त भारत अशी साद राज ठाकरे यांनी घातली आहे. गुढी पाडव्याच्या सभेनंतर जे वातावरण निर्माण झाले, ते टिकवण्यासाठी त्यांचा राज्यव्यापी दौरा लवकरच सुरू होईल.'' 

जिल्ह्यातील वाद मिटवणार- 
जिल्ह्यातील दोन गटाच्या वादावर श्री. नांदगावकर म्हणाले,""तानाजी सावंत आणि नितीन शिंदे यांचे स्वतंत्र गट आहेत. राज ठाकरे यांनी दोघांना वाद मिटवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही अद्याप मतभेद असतील तर मिटवले जातील. जिल्हाध्यक्षांनी ग्रामीण भागात तर शहराध्यक्षांनी शहरात काम करावे, असे सांगितले आहे.'' 

महापालिका लढणार- 
मागील निवडणुकीत मनसेचे उमेदवार रिंगणात होते. साडे बारा हजार मते मिळाली. पुन्हा एकदा निवडणूक लढवली जाईल. उमेदवार मिळाले तर निवडून येण्याचा निकष लावला जाईल असे श्री. नांदगावकर म्हणाले. मिरजेतील दिगंबर जाधव हे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे भाजप त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू जाधव तिकडे जाणार नाहीत असा विश्‍वासही व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com