सिव्हिलमध्ये रक्तपेढी सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मिरज - पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिली मातृ दुग्धपेढी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात कार्यान्वित झाली. रक्तातील विविध घटक पुरवणारी रक्तपेढीही मंगळवारी (ता. ८) संध्याकाळपासून मिरज शासकीय रुग्णालयात सुरू झाली. ही सुविधादेखील पुण्यानंतर फक्त मिरजेत उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली. 

मिरज - पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिली मातृ दुग्धपेढी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात कार्यान्वित झाली. रक्तातील विविध घटक पुरवणारी रक्तपेढीही मंगळवारी (ता. ८) संध्याकाळपासून मिरज शासकीय रुग्णालयात सुरू झाली. ही सुविधादेखील पुण्यानंतर फक्त मिरजेत उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली. 

मिरज सिव्हिलमधील रक्तपेढीचा प्रश्‍न वीस-पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता. रक्तपेढी नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नतेवर वैद्यकीय परिषदेने अनेकवेळा प्रश्‍न उपस्थित केले होते. रक्तपेढीच्या कामाला गेल्या दोन वर्षांत वेग मिळाला. अखेर काल सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिचे कामकाज सुरू झाले. रुग्णालयातील ५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून प्रारंभ केला. रक्तामधील सर्व घटक या पेढीमध्ये मिळणार आहेत. डॉ. सापळे यांनी सांगितले, की मिरजेतील पेढीमध्ये योग्य त्या शासकीय दरात रक्तघटक मिळतील. राजीव गांधी योजनेसह विविध योजनेच्या लाभार्थी रुग्णांना मोफत सेवा मिळेल.

सिव्हिलमधील रुग्णांबरोबरच बाहेरच्या रुग्णांनादेखील रक्तपुरवठा केला जाईल. शासकीय रुग्णालयात रक्तघटक देणारी रक्तपेढी सुरू होणे ही पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलीच सुविधा आहे. सांगलीतही लवकरच अशी सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

सांगलीत काही दिवसांपूर्वी मातृ दुग्धपेढी (मिल्क बॅंक) सुरू झाली. नवजात बालकांना दूध देण्याची क्षमता नसलेल्या मातांना ती सहायक ठरणार आहे. काही मातांना अशक्तपणा किंवा अन्य विकारांमुळे पुरेसे दूध येत नाही. अशावेळी दुग्धपेढीची मदत घेतली जाईल. भरपूर दूध असणाऱ्या मातांकडून दूध घेऊन त्याचे पाश्‍चरायझेशन केले जाईल. 

अतिशीत वातावरणात जपणूक करून गरजवंत बालकांना ते दिले जाईल. ही सुविधाही पुण्यानंतर फक्त मिरजेत सुरू झाली आहे. मंगळवारी तिची पहिली चाचणी झाली. एका मातेच्या दुधाचा पाश्‍चरायझेशनचा अहवाल मिळाला आहे. वेगवेगळ्या तापमानात चोवीस तासांपासून तीन महिन्यांपर्यंत दूध वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्याची येथे क्षमता आहे.

लवकरच उद्‌घाटन
सांगलीतील दुग्धपेढी आणि मिरजेतील रक्तपेढीचे उद्‌घाटन महिन्याभरात घेण्याचे नियोजन आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: sangli news blood bank start in civil hospital