वाचन चळवळीच्यावतीने २६ जवानांना पुस्तके भेट

धर्मवीर पाटील
रविवार, 28 जानेवारी 2018

इस्लामपूर - जवानांना कधीतरी सन्मान न देता त्यांचा कायमस्वरूपी सन्मान करावा. समाजासाठी त्यांचा त्याग मोठा आहे, असे मत जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले सुभेदार सचिन हजारे यांनी पेठ (ता. वाळवा) येथे व्यक्त केले.

इस्लामपूर - जवानांना कधीतरी सन्मान न देता त्यांचा कायमस्वरूपी सन्मान करावा. समाजासाठी त्यांचा त्याग मोठा आहे, असे मत जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले सुभेदार सचिन हजारे यांनी पेठ (ता. वाळवा) येथे व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाळवा, शिराळा व पलूस तालुक्यातील २६ जवानांना पेठ (वाळवा)  येथे सम्राट महाडिक यांच्या पुढाकाराने आणि वाचन चळवळीच्यावतीने पुस्तके देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक वाटपाच्या या अनोख्या उपक्रमाने सीमेवरील जवान भारावून गेले. सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. इस्लामपूर परिसरातून आतापर्यंत सुमारे ६१ जवानांना दीड हजारांवर पुस्तके देण्यात आली आहेत.

सुभेदार सचिन हजारे म्हणाले, "जवानांचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम आहे. जवान जिवंत असेपर्यंत त्याला किंमत मिळाली पाहिजे. सीमेवर सक्रिय असणाऱ्या जवानांवर कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही. सर्वांनी त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. आजूबाजूला परिस्थिती भयानक आहे. छोट्या छोट्या कामांसाठी पैसे द्यावे लागणे दुर्दैवी आहे. समाजात फोफावणाऱ्या भ्रष्टाचाराच्या निर्मुलनासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा."

पुस्तकांच्या माध्यमातून वैचारिक आणि जवानांच्या माध्यमातून देशप्रेमाची शिकवण देणारा उत्कृष्ट उपक्रम म्हणून वाचन चळवळीचे कौतुक करावे लागेल. समाजाने या उपक्रमाची दखल घेऊन पाठबळ द्यावे.
- सम्राट महाडिक,
माजी जिल्हा परिषद सदस्य.

प्रारंभी सरपंच मीनाक्षी महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद माजी सदस्य सम्राट महाडिक, विद्यमान जगन्नाथ माळी, पंचायत समिती सदस्य वसुधा दाभोळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी बजरंग शिंदे, संतोष डवंग, दीपक घोडके, रविराज केसरे, सागर शेलार, सरदार बारपटे, अधिक गुरव, विजय गुणवंत, तौफिक संदे, सुदर्शन पवार, अरुण यादव, दिगंबर चव्हाण, नितीन पाटील, अभिजित पाटील, शरद पाटील, संतोष हजारे, युवराज पाटील यांना पुस्तके देण्यात आली. प्रारंभी प्रा. डॉ. संजय थोरात यांनी वाचन चळवळीची भूमिका मांडली. प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी 'वाचन चळवळीचा धरून रस्ता, चल सीमेवर जाऊ जरा दोस्ता' हे गीत सादर केले. जवान तौफिक संदे, सुनील चव्हाण यांची भाषणे झाली.

महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, उपसरपंच अमीर ढगे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील, चंद्रकांत पवार, नामदेव कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, राहुल पाटील, वाचन चळवळीचे उमेश कुरळपकर, मिलींद थोरात, विनोद मोहिते, सूर्यकांत शिंदे, संदीप थोरात, प्रवीण पाटील उपस्थित होते. सुभाष भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक सुरेश पाटील यांनी आभार मानले.

६१ जवानांना १५०० च्यावर पुस्तके भेट

वाचन चळवळीला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपूर येथील वाचन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ६१ जवानांना प्रत्येकी २५ प्रमाणे १५०० च्यावर पुस्तके दिली आहेत. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे अशा प्रकारचा लष्करी जवानांसाठी भाषिक पुस्तकांचा उपक्रम राबवित आहे.

Web Title: Sangli News books gifted to 26 soldiers by reading movement