व्हायला जातो नवरा, होतोय ‘बकरा’

व्हायला जातो नवरा, होतोय ‘बकरा’

गुजराती नवऱ्याला लाखोंचा चुना लावून बायको पळाल्याचा गुन्हा दाखल झाला. कर्नाटकातील सीमाभागात फसवणुकीसाठी मुलींचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचा ‘आदर्श’ घेऊन सांगली-मिरजेसह राज्यात अशा प्रकारांनी धुमाकूळ घातला आहे. राजकिशोर वधू-वर सूचक केंद्र असो वा गुजराती नवऱ्याला गंडा घालणारी बाई, इथे लग्न बाजारात ‘नवरा’ व्हायला आलेल्यांना ‘बकरा’ बनवणारी साखळी सुरीला धार लावून बसली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे व्यस्त प्रमाण, लग्न संस्थेत वाढलेल्या अपेक्षा आदींमुळे संकट आहे. दलालांच्या भूलथापांना न भुलणे आणि सावधपणे ‘नाती’ जोडणे, हाच उपाय आहे. 

जिल्ह्यातील अनेक गावांत ‘अडचणी’चं लग्न ठरविणाऱ्या दलालांची संख्या वाढतेय. कर्नाटकच्या सीमाभागातील अथणीपासून गदगपर्यंत दलालांची साखळी काम करतेय. गरीब, मागास, भटक्‍या समाजातील मुलींचा ‘सौदा’ ही मंडळी करतात. मुलगी दिसते कशी, यावर दर ठरतो. तो ४० हजारांपासून एक लाखापर्यंत असतो. शिवाय लग्नाचा खर्च वेगळा. यातील सुमारे ६० टक्के रक्कम मुलीच्या कुटुंबीयांना दिली जाते अन्‌ ४० टक्के दलाली. त्यातील काही लग्न यशस्वी झाली आहेत. मात्र त्यातून नवी साखळी तयार झाली आहे. लग्न झाल्यानंतर आठवड्याने माहेरी जाताना मुली ‘दरोडा’ टाकत आहेत. सोन्याचे दागिने, घरी असतील-नसतील ते पैसे गुंडाळून त्या पसार होतात. एकेका मुलीने पाच-पाच लग्नं करून गंडा घातल्याचे प्रकरण बेळगावमध्ये उघड झाले. कोल्हापुरात त्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. धंदा सुरूच आहे. आता मिरजेतील तरुणींचा वापर सुरू झाल्याचे हैदराबाद प्रकरणाने उघड झालेय. 

हैदराबादला राहणाऱ्या गुजराती व्यापाऱ्याला बायकोने लुटले. ती सहा महिने सोबत होती. दागिने, पैसे घेऊन पोबारा केल्यावर त्याने मिरज गाठली. कारण लग्न मिरजेत झालं होतं. लग्न ठरविणाऱ्या जोडप्याविरुद्ध त्याची तक्रार होती. त्या जोडप्यानं ठरवून गंडा घातल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत. एकीकडे या व्यापाऱ्याचे दुखणे, तर दुसरीकडे सांगलीत उत्तर शिवाजीनगरमध्ये राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला फसवणुकीचा धंदा समोर आला. हे केंद्र नावालाच. हा सरळ सरळ फसवणुकीचा अड्डाच आहे. साठ वर्षांच्या ज्येष्ठाला वीस वर्षांची मुलगी लग्नासाठी पसंत करते. तो पन्नास-साठ हजार भरून जाळ्यात अडकतो.

पहिल्या पत्नीचे निधन झाले म्हणून गगनबावड्याचा नोकरदार माणूस लग्नासाठी अर्ज भरतो. चार-आठ दिवसांत मुलगी दाखवून चर्चेच्या तीन-चार फेऱ्या होतात. ५० हजार भरून ‘ॲग्रीमेंट’ होते. अचानक दोन्ही महिला गायब. मोबाईल ‘बंद’ होतो. केंद्रचालक फोन घेत नाही, घेतला तर त्या दोघी कुठे गेल्या माहीत नाही, असे सांगतो. ‘व्हायला आलो नवरा अन्‌ झालो बकरा’ अशी अवस्था. ही माणसं आता सैरभैर झालीत. पंधरा-वीस जणांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिलीय. साऱ्यांची अडचण एकच. यांना लग्नासाठी मुलीच मिळत नव्हत्या. ‘राजकिशोर’ने आशा दाखवली. जाळ्यात ते अडकले. पैशांचा पाऊस पाडला. ‘सकाळ’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सारे बाहेर आले. तरीही एक प्रश्‍न उरला की, या भामट्यांवर लोक विश्‍वास ठेवतात तरी कसा? 

पुण्यातील एका इंजिनिअर तरुणीला मुंबईच्या एकाने लग्नाची मागणी घातली. जाळ्यात ओढले. वेबसाईटवरून मामला जमला. मात्र सुदैवाने त्या मुलीचा भाऊ शहाणा निघाला. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या चतुराईमुळे ती वाचली. ‘...डॉट कॉम’ या संकेतस्थळावर तरी कसा विश्‍वास ठेवायचा. सारेच असे नाहीत, मात्र ताक फुंकून प्यावे, अशी स्थिती. महिला, मुलींचा ‘शस्त्र’ म्हणून वापर केला जातोय. तुम्ही विरोध केलात तर विनयभंग, बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली जाते. पैसे कमावण्याचा ‘शॉर्ट कट’ त्यांनी शोधलाय.

लग्नसंस्थेत निर्माण झालेल्या प्रचंड दरीमुळे त्यात अडकणाऱ्या बकऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे थांबविण्यासाठी पोलिस किंवा अन्य यंत्रणांपेक्षा स्वतः सावध असणे महत्त्वाचे आहे. एखादा बकरा सावध होण्याआधी शेकडो बकरे कापले गेलेले असतात. पुन्हा त्यांनी कितीही ओरडले, तरी लुबाडलेली हजारोंची रक्कम परत यायचे मार्गही बंद असतात. ‘राजकिशोर’वाला गजाआड होईलही; मात्र ज्यांचा थांगपत्ताच नाही, अशांना शोधणंही कठीण आहे.

बोगस वेबसाईट कशा पकडाल?
इंटरनेटवर असंख्य वधू-वर सूचक संकेतस्थळं तुम्हाला दिसतील; मात्र त्यापैकी कित्येक बोगस आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. गुगलवर WWW. संकेतस्थळाचं नाव .COM असे ऑपरेट केल्यानंतर जे संकेतस्थळ सुरू होईल, त्याच्या ‘बारकोड’ पट्टीच्या अगदी सुरुवातीला ‘हिरव्या रंगाचे कुलूप’ दिसले तर ते संकेतस्थळ सुरक्षित आहे, असे समजा. जर कुलूप नसेल तर शंका घ्याच. ‘राजकिशोर’ ऑपरेट करून बघा, हिरवं कुलूप दिसतंय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com