मल्लेवाडीत म्हैसाळ योजनेचा कालवा फोडण्याचा प्रकार

संतोष भिसे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मिरज - म्हैसाळ सिंचन योजनेतील कालव्याची वितरिका शेतकऱ्यांनी फोडली. मल्लेवाडी (ता. मिरज ) येथे कळंबी शाखा कालव्याच्या वितरिका क्रमांक दोनवर काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनोळखी शेतकऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली. 

मिरज - म्हैसाळ सिंचन योजनेतील कालव्याची वितरिका शेतकऱ्यांनी फोडली. मल्लेवाडी (ता. मिरज ) येथे कळंबी शाखा कालव्याच्या वितरिका क्रमांक दोनवर काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनोळखी शेतकऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली. 

काल रात्री काही शेतकऱ्यांनी वितरीकेचे गेट तोडून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. पाणी सोडू; पण नासधुस करु नका, अशी विनंती केली. शेतकऱ्यांनी त्यांना जुमानले नाही; त्यामुळे ग्रामीण पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिस येताच शेतकरी पळून गेले. आज प्रशासनातर्फे अनोळखी शेतकऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली.

तोडलेले गेट सकाळी दुरुस्त करुन घेण्यात आले. यादरम्यान, मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. शेतकऱ्यांनी पाणी चोरी किंवा नासधुस असे गैरप्रकार केले तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. 

दरम्यान, कृष्णा नदीतील पाणी पातळी कालपासून खालावली. उपसा करणाऱ्या पंपांची संख्या अकरापर्यंत कमी करण्यात आली. म्हैसाळमध्ये बंधाऱ्याजवळ किमान 526 मीटर पाणीपातळी आवश्‍यक असते; ती आज 525 मीटरपर्यंत खाली घसरली. वारणेतून पाणी सोडण्यात आले असून ते सध्या कोथळीपर्यंत पोहोचले आहे. उद्या म्हैसाळमध्ये पातळी वाढल्यानंतर उपसा वाढवण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा उद्रेक वाढला
दरम्यान, म्हैसाळ योजनेतून उपसा सुरु होऊन महिना होत आला तरी गावांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरुनही त्यांना पाणी मिळालेले नाही; त्यामुळे गावागावांतून उद्रेक वाढत आहे. आज मालगाव ग्रामस्थांनी पाण्यासाठी बेमुदत गाव बंदचा इशारा दिला होता. तेथील नेत्यांनी वारणालीमध्ये कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयावर धडक मारली.

कळंबीमध्ये वीस दिवसातून एकदा पिण्याचे एक-दोन घागरी पाणी मिळत आहे. तेथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनीही कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. पैसे भरुनही पाणी मिळत नसल्याने त्यांचा उद्रेक झाला होता. मिरज पूर्व भागातील अनेक गावांत अशीच स्थिती आहे.

कालव्यात सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यापुर्वीच पुरवठा बंद केला जात आहे; त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. मल्लेवाडी येथील शेतकऱ्यांनीही काल अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरेसे पाणी सोडण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी दुर्लंक्ष केल्याने अखेर शेतकऱ्यांनी कालवाच फोडला 

Web Title: Sangli News Canal Breakage in Mallewadi