खड्डेमुक्तीला हवं गर्भवतीचं प्रमाणपत्र - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विभागात प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० पुरस्कारांच्या योजनेची घोषणा करताना भंबेरी उडवणारी अट घातली आहे. हा रस्ता खरोखरच चांगला झालाय, खड्डे नीट बुजवलेत, याचे प्रमाणपत्र त्या भागातील गर्भवती महिला, कॉलेज युवती, ज्येष्ठ  नागरिक, सामाजिक कार्यकर्ते  आणि सरपंचांकडून घ्यावे लागणार आहे. 

सांगली - ‘‘मी एक नंबर खड्डे बुजवले, चोख  काम केलंय’’, असे मोघम सांगून अधिकाऱ्यांना पाटी टाकता येणार नाही किंवा पाठ थोपटून घेता येणार नाही. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विभागात प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० पुरस्कारांच्या योजनेची घोषणा करताना भंबेरी उडवणारी अट घातली आहे. हा रस्ता खरोखरच चांगला झालाय, खड्डे नीट बुजवलेत, याचे प्रमाणपत्र त्या भागातील गर्भवती महिला, कॉलेज युवती, ज्येष्ठ  नागरिक, सामाजिक कार्यकर्ते  आणि सरपंचांकडून घ्यावे लागणार आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केला. त्यांनी यामाध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र संकल्पनेला लोकाभिमुख करण्याचा मार्ग निवडला. राज्यभरात खड्डयांमुळे टीकेचे धनी झालेल्या पाटील यांनी बैठकीत ना सूचनांचा पाऊस पाडला, ना थरडपट्टी केली. आध्यात्मिक रूपात ‘मनाचे खड्डे’ भरताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना आनंदी  जीवनासाठी कौटुंबिक सल्ले दिले.  

श्री. पाटील यांनी बैठकीच्या सुरवातीपासूनच धक्के दिले. खरडपट्टी होणार, धुरळा उठणार, खडी उडणार, अशा दडपणाखाली सारे हजर होते. श्री. पाटील म्हणाले,‘‘मला सांगा, तुमच्यापैकी किती जण दिवसातील काही वेळ स्वतःसाठी देतात? पत्नीचे विचार शांतपणे ऐकतात? सामाजिक कार्य करतात? कुटुंबासमवेत एकत्र जेवतात? मुला-बाळांना विश्वासात घेऊन विश्वास देतात? हे करा. इथे कुठलेही दडपण न घेता सूचना, तक्रारी, अडचणी मांडा. कोणत्याही मोठ्या गोष्टीचा सुरवात छोट्या बाबींनी होते. त्यातून आत्मिक समाधान मिळते. समाजाप्रती उत्तरदायित्वाचा विचार करा. प्रामाणिकपणे काम करा. नव्या संकल्पना मांडा, स्वीकारा, अंमलात आणा. मुलाबाळांना जसा विश्वास देता, तसा आपल्या सहकाऱ्यांना विश्वास द्या.’’

खड्डेमुक्तीसाठी त्यांनी आज गोड डोस दिला. ते म्हणाले, ‘‘खड्डे मुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम होतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांशी संवाद साधला आहे. सांगलीसह ३० जिल्ह्यांना भेट दिली. गेल्या तीन वर्षांत २ हजार जणांना बढत्या दिल्या.  चुकीचे वागणाऱ्या २०० जणांना निलंबित केले, हेही विसरू नका.’’ आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि डी. एस. जाधव, भाऊसाहेब साळुंखे, पूजा बारटक्के, अजयकुमार ठोंबरे, एस. व्ही. बारवेकर, एस. बी. सोलनकर, शिवानंद बोलीशेट्टी, हेमंत गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Sangli news Chadrakant Patil comment