मतदारांना घरात जाऊन भेटवस्तू द्या - चंद्रकांत पाटील

सांगली : भाजपच्या बूथ प्रमुखांच्या शिबिरात शुक्रवारी मार्गदर्शन करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. व्यासपीठावर सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, नीता केळकर आदी.
सांगली : भाजपच्या बूथ प्रमुखांच्या शिबिरात शुक्रवारी मार्गदर्शन करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. व्यासपीठावर सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, नीता केळकर आदी.

सांगली - ‘‘भाजपचे काम संघटनात्मक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही एका बूथचे प्रमुख आहेत. बूथच्या माध्यमातून निवडणुकीला दिशा देण्याचा प्रयत्न असतो. बूथप्रमुख म्हणून तुम्ही येत्या पंधरवड्यात २०० घरांना भेट द्या. त्यांना पक्षाकडून भेटवस्तू द्या. घरभेटीच्या निमित्ताने कुटुंबाशी चांगले संबंध निर्माण करा. प्रत्येक गोष्ट मताशी निगडीतच नसते. यानिमित्ताने समाजाकडे तुम्हाला पाहता येईल. हृदय संवेदनशील ठेवून समस्या जाणून घ्या., असे आवाहन  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

पक्षाचे महापालिका क्षेत्र बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिर भावे नाट्यमंदिर येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, सुरेंद्र चौगुले, बटू बावडेकर, भारती दिगडे, शरद नलवडे, कुंदन वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 गेल्या ४० वर्षांत मी जे गणित मांडले ते कधीच चुकले नाही. मी काही ज्योतिष नाही; परंतु सांगली महापालिकेचे नागपूरच्या एजन्सीने केलेले सर्वेक्षण माझ्या खिशात आहे. महापालिकेत ‘बीजेपी ब्रॅण्डेड’च महापौर असेल, असा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीत बूथ प्रमुखांनी सतर्क राहावे. बूथ रचना जिथे सक्षम असते, तेथे निवडणूक जिंकणे डाव्या हाताचा मळ असते. बूथ रचना बळकट केली तर महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड नाही. २०० कुटुंबांशी बूथ प्रमुखांनी संपर्क ठेवला तर त्या कुटुंबातील हजारपैकी तीनशे तरी मते नक्कीच मिळतील.’’

मकरंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेखर इनामदार यांनी प्रास्ताविक केले. बूथ प्रमुखांची हजेरी नोंदवून घेतली. ‘एक बूथ ३० सदस्य’ याप्रमाणे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. कुपवाडचे माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत, दिनकर चव्हाण, सुधीर पाटील, संजय पाटील, मदन काळे, बबन खाडे, शशिकांत जाधव या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नेते बूथच्या खुर्चीत
भावे नाट्य मंदिरात बूथ क्रमांकानुसार बैठक व्यवस्था केली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील बूथ क्रमांक खुर्चीवर टाकले होते. त्यानुसार व्यासपीठासमोर बूथ प्रमुख आपापल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसले होते. बूथ क्रमांक पुकारल्यानंतर प्रमुख उठून हजर असल्याचे सांगत होते. आमदार गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर हे बूथप्रमुख असल्यामुळे ते देखील खुर्चीत बसले होते. त्यांनी तेथूनच हजेरी दिली. हजेरी झाल्यानंतर चंद्रकांतदादांनी त्यांना समोर बोलवले. मग व्यासपीठावर विराजमान झाले.

बूथ प्रमुखांचा सत्कार
एका बूथवर ३० सदस्यांची नोंदणी करण्यास पक्षाने सांगितले आहे; परंतु शंभरपेक्षा अधिक नोंदणी करणाऱ्या अश्‍विनी तिडके, सतीश हंबर, सागर खोत, मनोज कोरडे आदींचा भेटवस्तू देऊन सत्कार झाला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com