चंदनासह चार लाखांचा मुद्देमाल संखमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

जत - संख (ता. जत) येथील अंकलगी रस्त्यावरील रेपगुड वस्तीवर छापा टाकून दीडशे किलो चंदनाचे लाकूड, इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भीमाण्णा ऊर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७, रेपगुड वस्ती, संख) याला अटक करण्यात आली आहे.

जत - संख (ता. जत) येथील अंकलगी रस्त्यावरील रेपगुड वस्तीवर छापा टाकून दीडशे किलो चंदनाचे लाकूड, इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भीमाण्णा ऊर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७, रेपगुड वस्ती, संख) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालया समोर उभे केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश मिळाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल सायंकाळी कारवाई केली. 

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिलेत. पोलिस निरीक्षक राजन माने यांना संख येथील रेपगुड वस्तीवर चोरीच्या चंदनाचा साठा असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश  दिले. 

पथकाने गुरुवारी सायंकाळी अंकलगी रस्त्यावर  असलेल्या रेपगुड वस्तीवरील भोसले याच्या घरावर अचानक छापा टाकला. झडती घेतल्यानंतर तेथे  चंदनाच्या लाकडाने भरलेली सात पोती आढळली. एक इलेक्‍ट्रॉनिक वजन काटाही आढळला. भोसलेकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे  दिली. त्याला ताब्यात घेऊन उमदी पोलिस ठाण्यात  त्याच्या विरोधात चोरीसह वनसंरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्याने चंदनाची झाडे तोडून मोठ्या प्रमाणात चंदन  साठवले असावे असा संशय पोलिसांना आहे.  त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. चंदन चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अझर पिरजादे, अशोक डगळे, अमित परीट, राहुल जाधव, चेतन महाजन यांच्या पथकाने कारवाई केली.
---------

Web Title: Sangli News Chandan and Four lakhs rupees seized

टॅग्स