प्राथमिक शाळांतील शिक्षकांची गुणवत्ता तपासणार - निशादेवी वाघमोडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सांगली - जत येथील शाळेत शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांचे अज्ञान उघड झाले. हा प्रकार म्हणजे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कोठून’, असाच म्हणावा लागेल. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन नोटीस काढली. लवकरच जिल्ह्यातील शाळांना अचानक भेटी देऊन शिक्षकांची पात्रता तपासली जाईल, असा इशारा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती निशादेवी वाघमोडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

जत येथील बाल विद्यामंदिर शाळेला श्रीमती वाघमोडे, शिक्षण सभापती यांच्या पथकाने भेट दिली. तिसरीच्या वर्गात थेट प्रवेश केला. मुलांची परीक्षा घेतली तेव्हा साधी बेरीज-वजाबाकीची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे शिक्षिकेची परीक्षा घेतली. वजाबाकीचे उत्तर देता आले नाही.

मुख्याध्यापिका यांना बोलवून प्रकार सांगितला. त्यांनी शिक्षिका इंग्रजी माध्यमाच्या असल्याचे सांगून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीमती वाघमोडे यांनी शिक्षिका, मुख्याध्यापिका यांना इंग्रजी टंग (जीभ) चे स्पेलिंग विचारले. दोघींनी देखील चुकीचे स्पेलिंग लिहिले. एकंदरीत प्रकारच गंभीर होता. त्यामुळे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध नोटीस बजावली. 

शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार चिंताजनकच आहे. याबाबत श्रीमती वाघमोडे म्हणाल्या, खासगी शाळातील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचा हा प्रकार शिक्षकांची परीक्षा घेतल्यानंतर उघड झाला. त्यामुळे शिक्षकांची पात्रता तपासण्याची वेळ आली आहे. यापुढे जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांची परीक्षा घेतली जाईल. खासगी शाळांबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देखील भेटी दिल्या जातील. या परीक्षेत शिक्षक नापास झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वेतनवाढ रोखण्याबरोबर योग्य ती कारवाई केली जाईल. खासगी शाळातील शिक्षकांपेक्षा जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची प्रगती चांगली आहे. तरीही अचानक भेटी देऊन गुणवत्ता तपासली जाणार आहे.

Web Title: sangli news check the quality of teachers in primary school