राज्यात पुढील वर्षापर्यंत 20 हजार गावे दुष्काळमुक्त -  मुख्यमंत्री फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली/जत - राज्यात जलयुक्त शिवार योजनेतून गेल्यावर्षापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी जवळपास सहा हजार गावे दुष्काळमुक्त होतील. तर पुढील वर्षाअखेरीस राज्यातील जवळपास 20 हजार गावे दुष्काळमुक्त होतील असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सांगली/जत - राज्यात जलयुक्त शिवार योजनेतून गेल्यावर्षापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी जवळपास सहा हजार गावे दुष्काळमुक्त होतील. तर पुढील वर्षाअखेरीस राज्यातील जवळपास 20 हजार गावे दुष्काळमुक्त होतील असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जत तालुक्‍यातील बागलवाडी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी श्रमदान केले. त्यानंतर ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेला अभिनेता अमिर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी ध्यास घेऊन श्रमदान केले. पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून जिरवला. आज 75 तालुक्‍यातील हजारो गावे झपाटून काम करत आहेत. तीन ते साडे तीन वर्षापूर्वी राज्यातील 52 टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणे बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणे तर आवश्‍यकच आहेत. परंतू त्याचबरोबर विकेंद्रीत पद्धतीने पाणलोटाचे स्त्रोत निर्माण करणे आवश्‍यक आहे. म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून पुढील वर्षाअखेरीस 20 हजार गावे दुष्काळमुक्त होतील. दुष्काळी भागातील लोकांनी आव्हान स्विकारून दुष्काळाशी दोन हात करून पराभूत केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे. जत तालुक्‍याची दुष्काळी तालुका अशी ओळख होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे तालुका टॅंकरमुक्त होऊ लागला आहे. बागलवाडी ग्रामस्थांनी याचा प्रत्यय दिला आहे. 
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी बागलवाडी गावातील श्रमदानापूर्वी आवंढी गावात उत्स्फूर्त स्वागत केले.

आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आदी उपस्थित होते. 

Web Title: Sangli News Chief Minister Devendra Phadanvis comment