मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राजकीय ‘खडाखडी’

शांताराम पाटील
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर शहराला मिळालेल्या निधीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात थेट जयंतरावांना मैदानात या असे आव्हान देऊन निशिकांत पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. आता जयंतराव त्यांच्या या आव्हानाला कसे प्रत्युत्तर देतात हे यथावकाश स्पष्ट होईल.

इस्लामपूर - कुस्तीच्या मैदानात दोन मल्ल एकमेकास भिडण्याआधी सुरू असते तशी खडाखडी सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूरच्या राजकीय मैदानात सुरू आहे. दोन्ही बाजूचे मल्ल अंगाला अंग न भिडवता एकमेकास दुरूनच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर शहराला मिळालेल्या निधीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात थेट जयंतरावांना मैदानात या असे आव्हान देऊन निशिकांत पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. आता जयंतराव त्यांच्या या आव्हानाला कसे प्रत्युत्तर देतात हे यथावकाश स्पष्ट होईल.

विरोधक जेव्हा आव्हानाची भाषा करीत असतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्याच ताफ्यातला शिलेदार बाजूला काढत धोबी पछाड द्यायचा डाव जयंतराव नेहमीच टाकतात. कधी कधी आव्हान देणाऱ्यालाच ते वश करतात. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गळाला एखादा विरोधक  लागतोच हा इतिहास आहे. यावेळी कोणाचा क्रमांक याबाबतही इस्लामपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधीच निशिकांत पाटील यांनी एकच गदारोळ उठवून दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात पालिकेला शासनाकडून मिळालेला निधी आणि जयंतरावांच्या कारकिर्दीत मिळालेला एकूण निधीची तुलनात्मक गणित मांडले. त्यांच्या या आकडेवारीला उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिले. 

खरे तर कोणी किती निधी आणला, त्यातला किती खर्च झाला, मंजूर किती हे सारे गणिती आकडे सिद्ध करण्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञांची गरज नाही. निशिकांत पाटील यांनी योजनानिहाय खर्च झालेल्या निधीचे आकडे मांडूनच त्याला प्रत्युत्तर द्यायला हवे. मात्र राजकारणात असे सरळ गणित कधी नसते. निशिकांत पाटील यांनी जयंतरावांनी आता बगलबच्च्यांना पुढे न करता थेट मैदानात यावे आणि चर्चा करावी असे आव्हान दिले. या बरोबरच त्यांनी ‘आम्ही भोसले आहोत’ असे सांगत जातीअंतर्गत पोटजातीचे समीकरणही विशद केले. 

त्यामुळे आता विधानसभेच्या मैदानाचीच खडाखडी सुरू झाल्याची चर्चा आहे. हा सामना जयंत पाटील विरुद्ध सदाभाऊ-निशिकांत असा थेट असेल. जयंतरावांच्या आजवरच्या खेळींला उलट चाल म्हणून त्यांच्याच टीममधील काही खेळाडू गळाला लावण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या चिरंजीवाचा भाजपप्रवेश अपेक्षित परिणाम साधू शकलेला नसल्याने असेच आणखी खाही खेळाडू शोधले जात आहेत.

मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ आणि नगराध्यक्षपदी आल्यानंतर निशिकांत यांनी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. गावागावात प्रस्थापितांविरोधातील चेहरे हाताशी धरून ते मक्तेदारी मोडू पहात आहेत. थेट संपर्क हेच त्यांचे अस्त्र आहे.  मात्र गेल्या तीस वर्षांत हेच अस्त्र परजून राज्यस्तरावर मजल मारलेल्या जयंतरावांसाठी अशी आव्हाने नवी नाहीत. सातवेळा विधानसभेवर जाताना त्यांनी अशा आव्हानांचा सहज मुकाबला केला आहे. मात्र यावेळचे त्यांच्यासमोरचे आव्हान बहुपदरी ठरण्याची शक्‍यता  दिसत आहे. दोन्ही पैलवानांमधील खडाखडी किती काळ सुरू राहते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
............

Web Title: Sangli News Chief Minister Tour Political Special