बेवारस मृतदेह सोपवून जिवंत व्यक्तीला केले मयत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रकार घडला. यामुळे खळबळ माजली. अविनाश दादासो बागवडे असे मृत ठरवलेल्या जिवंत रुग्णाचे नाव आहे. तो तासगाव येथील आहे.

सांगली - येथील वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रकार घडला. यामुळे खळबळ माजली. अविनाश दादासो बागवडे असे मृत ठरवलेल्या जिवंत रुग्णाचे नाव आहे. तो तासगाव येथील आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव येथील कासार गल्लीत राहणारा अविनाश दादासो बागवडे याला आठ दिवसांपुर्वी सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयातून तो मयत झाल्याचा निरोप गेला. त्यानंतर आज पहाटे त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोचले.

शवविच्छेदन खोलीतील मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांनी दुपारी तासगावला घरी नेला. तेथे गेल्यानंतर मृतदेहाचा चेहरा पाहिल्यावर तो "आपल्या' रुग्णाचा नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यावेळी खळबळ उडाली. दुसऱ्याचाच मृतदेह आपल्याला कसा दिला. याचा संताप येवून नातेवाईकांनी मृतदेह तसाच शासकीय रुग्णालयात परत आणला. रुग्णालयात हा प्रकार समजल्यानंतर चौकशी केल्यावर अविनाश बागवडे आयसोलेशन वॉर्डात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णालयातही खळबळ उडाली.  

बागवडेच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी सिव्हीलच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त करत सिव्हील प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आपला रुग्ण जिवंत असल्याची खात्री झाल्यानंतर नातेवाईक, मित्रांनी सुटकेचा निश्वास टाकला खरा.. पण त्यांना दिलेला मृतदेह कुणाचा याचा शोध घेतला जात आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाने बागवडेच्या नातेवाईकांकडून बेवारस मृतदेह लवकर ताब्यात घेतला नाही. अखेर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे आदेश दिले.   

चौकशी समिती नेमली  

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यी समिती नेमण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांनी दिली. ते म्हणाले, या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करु. त्याचा अध्यक्ष मीच आहे. 48 तासात समितीचा अहवाल घेऊन या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.   

शंका व्यक्त करूनही

अविनाश बागवडे याचा पुतण्या अमित मोतीचंद बागवडे यांनी सांगितले की, सकाळी मृतदेहाचा चेहरा पाहून तो आपल्या रुग्णाचा नसल्याची शंका मी व्यक्त केली होती. मात्र त्यांना हा तुमचाच रुग्ण असल्याचे सांगण्यात आल्याने लवकर मृतदेह ताब्यात घ्या असे सांगण्यात आले. त्यामुळे तो घेतला आणि घरी नेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

Web Title: Sangli News Civil Hospital miss management