शुद्ध पाण्‍यासाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची लूट...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून न देण्यामागच्या कारणांचा शोध घेता अनेक बाबी समोर आल्या. पाणी शुद्धीकरण करून दिले तर २० रुपये लिटरचे मिनरल कम शुद्ध पाणी कोण घेणार? त्यात प्रत्येक बाटलीमागचा नफा १० ते १२ रुपयांचा आहे. त्यावर का पाणी सोडा? हा हॉटेलवाल्यांचा धूर्तपणा आहे. अनेक ठिकाणी पाच-सात रुपयांत वीसएक लिटर पाणी देणारी केंद्रे उभी राहिली आहेत.

सांगली -  कृष्णा नदीचे ‘शुद्धीकरण’ केलेले पाणी खरचं पिण्यायोग्य आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला सध्या तरी कुठल्या प्रयोगशाळा अहवालाची गरज आहे. तरीही, सांगली, मिरजेसह परिसरातील बहुतांश हॉटेल व बड्या ढाब्यांवर थेट कृष्णा नदीचे पाणी हॉटेलमध्ये कोणतेही शुद्धीकरण न करता दिले जात आहे. हे पाणी कुणी पीत नाही, त्यांनी बाटलीबंद पाणी घ्यावे, यासाठी हा उद्योग सुरु आहे. ही ग्राहकांची लूटच आहे.

जेवन, नाष्टा, चहा सारे मनमानी दराने विकणाऱ्यांना किमान शुद्ध पाणी द्यावे असे का वाटत नाही? त्यांना सक्ती करण्याचे धाडस अन्न प्रशासनाकडे नाही. भले पाण्याचा एक रुपया जास्त घ्या, पण पाणी शुद्ध करून द्या, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

शहरात बहुमजली हॉटेल्सची संख्या वीसच्या घरात आहे. मध्यम हॉटेल्स पन्नासहून अधिक आहेत. छोटे हॉटेल आणि नाष्टा सेंटरची संख्या अगणित आहे. यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्‍या लोकांकडेच स्वतःची पाणी शुद्धीकरणाची स्वतंत्र यंत्रणा आहे. बाकी साऱ्यांकडे नळाचे पाणी भरून थेट दिले जाते. त्या पाण्याला हिरवा, पिवळा रंग पाहूनच ओकारी यावी, इतकी भयानक स्थिती आहे. अलीकडेच एका संघटनेने पाण्याचे नमुने तपासून घेतले. पालिकेच्या यंत्रणेतून शुद्धीकरण झालेले पाणी पिण्यायोग्य नाही, असा अहवाल आला. महापालिकेच्या पाण्याची बदनामी खूप झालेली आहेच. त्याचा फायदा हॉटेलवाले घेत आहेत. ग्राहकांना शुद्ध पाणी हवे असेल तर २० रुपये मोजावे लागतात. 

पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून न देण्यामागच्या कारणांचा शोध घेता अनेक बाबी समोर आल्या. पाणी शुद्धीकरण करून दिले तर २० रुपये लिटरचे मिनरल कम शुद्ध पाणी कोण घेणार? त्यात प्रत्येक बाटलीमागचा नफा १० ते १२ रुपयांचा आहे. त्यावर का पाणी सोडा? हा हॉटेलवाल्यांचा धूर्तपणा आहे. अनेक ठिकाणी पाच-सात रुपयांत वीसएक लिटर पाणी देणारी केंद्रे उभी राहिली आहेत. किमान तेथून पाणी आणावे... पण, त्याची गरज वाटत नाही. कारण, ‘शुद्ध’चा आग्रह करणारे गुमाट्याने २० रुपये मोजून बाटली घेतात. इतरांनी नखरे केले तर सरळ ‘नळाचे पाणी आहे, शुद्ध आहे’, असे  उत्तर दिले जाते. याविरुद्ध अन्न प्रशासनाने थेट मोहीम  हाती घेण्याची गरज आहे. 

हातगाडेवाली भले
हातगाडीवर भजी, पावभाजी, ऑम्लेट, बुर्जी विकणाऱ्या अनेकांकडे शुद्ध पाण्याचे जार दिसतात. ते पाच-पन्नास रुपये खर्च करून लोकांना शुद्ध पाणी देतात. तुलनेत हजारो रुपयांचा ‘गल्ला’ जमवणाऱ्या बड्या हॉटेल्समध्ये हे का नाही? ५० पैसे लिटर पाणी मिळते, तेवढाही खर्च करायला ते मागे पहात आहेत. 

३०० टीडीएस
महापालिकेच्या शुद्ध पाण्याचा टीडीएस सुमारे ३०० च्या घरात आहे. शुद्ध पाण्याच्या निकषापेक्षा तो पाच पटीने जास्त आहे. हे पाणी पिल्यानंतर लोक आजारीच पडणार, हे नक्की. घसघशीत पैसे मोजून घेणाऱ्या हॉटेलवाल्यांनी हे पाणी पाजावे का?

Web Title: Sangli News clean drinking water problem