सांगलीत जकात नाक्‍यांच्या मोक्‍याच्या जागांचाही बाजार

सांगलीत जकात नाक्‍यांच्या मोक्‍याच्या जागांचाही बाजार

सांगली - बंद पडलेल्या जकात नाक्‍यांच्या मोक्‍याच्या जागांचा बाजार आता मांडला आहे. फक्त जकात नाके भाड्याने द्यायचे ठराव चोरमार्गाने करीत तेथील कोट्यवधी रुपयांचे भूखंडच आप्त नातेवाइकांच्या घशात परस्पर घालण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी रचले आहे. त्यातल्या पहिल्या तीन म्हणजे माधवनगर, सांगलीवाडी आणि कोल्हापूर रस्त्यावरील काही एकरांच्या जागा तुटपुंज्या रकमेत भाड्यात द्यायचा घाट घातला आहे.

पूर्वी जकात नाक्‍याजवळ वाहने थांबवण्यासाठी मोठ्या जागा पालिकेने खरेदी केल्या होत्या. अशा काही एकरांमध्ये जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत.  त्यात कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर मंगल कार्यालयाजवळ अडीच एकर जागा आहे. माधवनगर रस्त्यावर (नियोजित एसटी स्थानकाच्या जागेजवळ) २६ गुंठे, तर सांगलीवाडी हद्दीत समडोळी फाट्याजवळ ८३ गुंठे जमीन आहे. महापालिकेतील दोघा नगरसेवकांच्या नातेवाईकांना या जागा भाड्याने द्यायचा घाट घातला आहे.

सांगलीवाडीची जागा वार्षिक ५५ हजार, माधवनगर व कोल्हापूर रस्ता जागेसाठी प्रत्येकी २२  हजार रुपये भाडे निश्‍चित केले आहे. याबाबतच्या प्रशासनाच्या प्रस्तावात सूरज विष्णू खंडागळे यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी माधवनगर आणि सांगलीवाडी नाक्‍यांची भाड्याने मागणी केल्याचे म्हटले आहे. 

नगररचना विभागाने या जागेचे रेडीरेकनरप्रमाणे भाडे निश्‍चित केले आहे तसेच उर्वरित जकात नाक्‍यांचा लिलाव केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल असे म्हटले आहे. मग या तीन जकात नाक्‍यांच्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया का नाही, असा ओघानेच प्रश्‍न येतो. 

मुख्य रस्त्यांवर कोट्यवधी किमतीच्या या जागांचा वापर सार्वजनिक हेतू समोर ठेवूनच झाला पाहिजे. या जागांवर हॉटेल्सच सुरू केली जाण्याचा शक्‍यता आहे. भाड्याने देताना त्याचा वापर काय होणार याची चौकशीची तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही. कागदावर नाका भाड्याने दिल्याचे दाखवून या जागा हडप केल्या जाणार आहेत. प्रशासनाचा ठराव गोलमाल आहे. त्यासाठी फक्त शेडच भाड्याने देणार आहात किंवा किती जागा भाड्याने देणार याचा खुलासा केला पाहिजे. चोरी छुपे या जागा आपल्या बगलबच्च्यांच्या गळ्यात मारण्याचाच हा उद्योग आहे.

आंधळे दळते...
महापालिका क्षेत्रात एकूण ३४ जकात नाके आहेत. यातल्या अनेक जकात नाक्‍यांवर नगरसेवकांनीच अतिक्रमण केले आहे. हरिपूर रस्त्यावरील जकात नाका पाडून तेथे नुकतेच एक टोलेजंग शेड मारण्यात आले. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील एका नाक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून मिरजेतील  कारभाऱ्यांच्या आशीर्वादाने झेरॉक्‍स सेंटर सुरू आहे. हे जकात नाके आता प्रशासनाला शोधूनही सापडणार नाहीत अशी स्थिती आहे. या जागांचे शेड भाड्याने द्यायचे  ठराव करायचे आणि संपूर्ण जागा घशात घालायची असा हा डाव आहे. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, अशी महापालिकेची अवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com