जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्ताचा फज्जा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आलेले दलित महासंघाचे कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध शिवराळ शब्दांत घोषणाबाजी करीत कार्यालयात घुसले. पोलिस बंदोबस्ताचा फज्जा उडवत त्यांनी पोलिस व प्रशासनाची तारांबळ उडवली. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आलेले दलित महासंघाचे कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध शिवराळ शब्दांत घोषणाबाजी करीत कार्यालयात घुसले. पोलिस बंदोबस्ताचा फज्जा उडवत त्यांनी पोलिस व प्रशासनाची तारांबळ उडवली. दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी तत्काळ लक्ष घालून बैठक लावतो, अशी ग्वाही दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा जयजयकारही केला. यानिमित्त पुतळ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आलाच, मात्र त्याहून अधिक तीव्रतेने बंदोबस्तातील पोकळपणा चव्हाट्यावर आला. जिल्ह्याच्या मुख्यालयातील बंदोबस्ताची त्रेधातिरपीट उडाली. 

प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाचे दोनशेवर कार्यकर्ते चारचाकी व दुचाकीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आले. प्रवेशद्वार बंद करण्यात आले. पोलिसांनी पाच लोकांचे शिष्टमंडळ आत जाईल, असे सांगितले. त्यांना न जुमानता महासंघाने दहा लोक जातील, अशी भूमिका घेतली. दरवाजा उघडला असता सर्वच कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली. शिवराळ भाषेत अधिकाऱ्यांचा उद्धार करीत आंदोलनकर्ते आत घुसले. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर त्यांना समजावून सांगत मोजक्‍याच लोकांना आत सोडले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पराज चौकातील पुतळा प्रश्‍नावर महापालिका व जिल्हा प्रशासनाची तातडीने बैठक बोलावू, प्रश्‍न इथे सुटला नाही तरी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी शिवराळ भाषेत घोषणाबाजीवर विचारणा केली. त्या वेळी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिल्याने गैरसमज झाल्याचा खुलासा प्रा. सकटे यांनी केला. चर्चेतून बाहेर पडताना "जिल्हाधिकाऱ्यांचा जयजयकार' अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्य प्रवेशद्वारात ठाण मांडून प्रा. सकटे यांनी भाषण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यावरचा राग व्यक्त करण्यात आला. उत्तम कांबळे, आसिफ बावा, अशोक तिवडे, सतीश मोहिते, गॅब्रियल तिवडे, आकाश तिवडे आदी उपस्थित होते. 

स्वतंत्र चौकशी 
पोलिस बंदोबस्त तोडत आंदोलक आत कसे घुसले, याची पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. उपअधीक्षक धीरज पाटील चौकशी करणार आहेत. आंदोलकांविरुद्ध कारवाई करावी का, हा मुद्दाही चर्चेत आला; परंतु कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याने त्याला हवा न देण्याची भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली. 

Web Title: sangli news collector office dalit mahasangh