शस्त्रपरवान्यांची खैरात रोखली - काळम-पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

सांगली - ‘कुणीही उठतो आणि शस्त्रपरवाना मागतो. त्याला शस्त्र चालविता येते, असे प्रमाणपत्रही डोळे झाकून दिले जाते. हे आता चालणार नाही. शस्त्र परवान्यांची खैरात आम्ही थांबवली आहे. ती शोभेची वस्तू म्हणून वाटली जाणार नाही,’ अशी परखड भूमिका जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

सांगली - ‘कुणीही उठतो आणि शस्त्रपरवाना मागतो. त्याला शस्त्र चालविता येते, असे प्रमाणपत्रही डोळे झाकून दिले जाते. हे आता चालणार नाही. शस्त्र परवान्यांची खैरात आम्ही थांबवली आहे. ती शोभेची वस्तू म्हणून वाटली जाणार नाही,’ अशी परखड भूमिका जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात यापूर्वी तब्बल सहा हजार ५६६ शस्त्रपरवाने होते. त्यांतील चार हजार ३९ परवाने रद्द केले गेले. सध्या केवळ दोन हजार ५२७ परवाने आहेत. यंदा केवळ ५४ परवान्यांना मान्यता दिली आहे. तब्बल ७८ परवाने नामंजूर करण्यात आले. २०१२ ते २०१६ या काळातील ८०० प्रकरणांचे अहवाल पोलिसांकडून आलेले नाहीत. ही सारी आकडेवारी, शस्त्रपरवाना देण्याआधी घेतलेल्या मुलाखती हे सारेच धक्कादायक आहे. कारण, शस्त्राविषयी प्राथमिक माहिती नसणारे, शस्त्र बाळगावेच असे ठोस कारण नसलेले कित्येक लोक येतात. उगाच खैरात वाटावी, तसे परवाने मी वाटणार नाही. एक माणूस दोन-दोन शस्त्रांचे परवाने मागतोय. एकावेळी दोन शस्त्रे कशाला हवीत? यांना शस्त्र चालविता येते, असे प्रमाणपत्र मिळतेच कसे, याचा मी शोध घेणार आहे. संबंधित प्रशिक्षण संस्थेलाही नोटीस काढणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील परवाना घेऊन परराज्यांत राहणाऱ्यांना शस्त्र वापरण्यास मी मान्यता देणार नाही. तो फार अडचणीचा विषय ठरू शकतो. त्यामुळे जो सांगली जिल्ह्यात राहतोय आणि निकषांना संपूर्ण पात्र आहे, अशांनाच परवाना दिला जाईल. 

जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी चर्चा केली. मोकळ्या हाताने शिफारशी देऊ नका, असेही स्पष्ट केले. त्यांनी बारकाईने तपासणी करू, अशी ग्वाही दिली. त्यामुळे नक्कीच सुधारणा दिसेल.’’

गोळ्या किती... चार की पाच?
श्री. काळम-पाटील म्हणाले, ‘‘पिस्तूल परवाना मागणाऱ्यांच्या मुलाखती होतात. मी विचारतो, पिस्तूलमध्ये गोळ्या किती असतात? कुणी चार, कुणी पाच सांगतो... यांना पिस्तूल माहिती नसेल तर परवानगी द्यायची का? काहींकडे जुन्या रायफलीचे परवाने आहेत, त्यांना आणखी पिस्तूलचे परवाने हवेत. हरकत नाही, देतो; मात्र जुना परवाना रद्द करावा लागेल.’’

 

Web Title: Sangli News Collector Vijaykumar Kalam-Patil Press