इथे साहित्यिकांचे ऐकतोयच कोण?

इथे साहित्यिकांचे ऐकतोयच कोण?

महाराष्ट्र संकटात असताना मराठी साहित्यिक भूमिका का घेत नाहीत, का बोलत नाहीत, असा सवाल उपस्थित करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्य वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. राजकारणापासून साहित्यापर्यंत सर्व क्षेत्रांना ‘कॉर्पोरेट स्पर्श’ झाल्याने भूमिकांना खरंच महत्त्व राहिलं आहे का आणि साहित्यिकांची दखल घेतली जावी, इतकी संवेदनशीलता निर्णयकर्त्यात आहे का, असे अनेक सवाल यानिमित्त उपस्थित होतात. जिल्ह्यातील नव्या पिढीतील साहित्यिकांना काय वाटते, याचा घेतलेला हा कानोसा... 

ठाकरेंचे आवाहन स्वागतार्ह
साहित्यिक समाजातील सर्वांत संवेदनशील घटक आहे. त्याच्याकडून सामाजिक प्रश्‍न परखडपणे मांडण्याची अपेक्षा रास्तच आहे. तो साहित्यातील राजकारणात व्यस्त आहे. निवड, नियुक्ती, पुरस्कार, सत्कार याच्या फंदात पडून राजकीय पक्षांशी सलगी करून स्वतःची जबाबदारी विसरला आहे. राज ठाकरे यांनी साहित्यिकांना राज्यातील प्राप्त परिस्थितीवर लेखणी सरसावण्याचे केलेले आवाहन स्वागतार्ह आहे.
-संदीप नाझरे,
आमणापूर.

शब्दांना मान आहे?
राज ठाकरे यांच्या मताचा आदर केला पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळातील राजकारण विचाराचे राजकारण असायचे. तिथे साहित्यिकांच्या शब्दाला मान असायचा. साहित्यिक, कलावंत समाजातील महत्त्वाचे घटक होते. आज कवी, कथाकार दमदार लिहीत आहेत. साहित्यिक, पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होताहेत. जाती-पातीच्या राजकारणाने विवेकाचा आवाज दाबला जातोय. लेखकांच्या विचारांचा आदर केल्यास गतवैभव प्राप्त होईल. 
-जयवंत आवटे

अर्धसत्य, पण दुरुस्तीयोग्य
लेखक, कवी भूमिका घेऊन लिहीत नाहीत, हे अर्धसत्य आहे. आपला परिसर ते जागतिक स्तरावरील घडामोडींचा साक्षीदार साहित्यिक असतोच असतो. या वास्तवामागील वास्तव तो संकेतातून मांडतो इतकेच. आतून आलेले लिहिणे आणि भूमिका घेऊन लिहिणे यात फरक आहे. विविध प्रश्‍नी साहित्यिक समकालीन जाणीवेतून व्यक्त होतात. व्यवस्थेला जाबही विचारतात; पण वाचकच कमी होताहेत. साहित्याला राजकीय व्यवस्था मनावर घेत नाही. सर्व प्रकारच्या दडपशाहीच्या विरोधात प्रखर भूमिका घेण्यात लेखक काही अंशी कमी पडताहेत; मात्र त्यांच्या एकट्याचीच ती जबाबदारी आहे का? 
-दयासागर बन्ने

भूमिका आहे, पण...
महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांच्या आक्रमणापेक्षा जाती-पातीचं राजकारण, गटा-तटातील विभाजन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जातीच्या नावावर देश विभागला गेला तर अराजकता माजेल. त्यामुळे साहित्यिकांनी जाती-पातीपेक्षा राष्ट्रीयत्व महत्त्वाचे आहे, हे ठासून सांगणारी भूमिका आधी घेतली पाहिजे. साहित्यिक भूमिका घेताहेत; पण ते वाचले जात नाही. साहित्य सोशल मीडियावरील चर्चेत अडकले आहे. साहित्यिकांनी महाराष्ट्रातील स्थितीसोबतच राष्ट्रीयत्वाला अधिक महत्त्व द्यावे, असे वाटते.
-रवी राजमाने

आवाज दाबला जातोय
रोजच्या बदलत्या स्थितीत साहित्यिक स्वतःला मोकळा करू शकत नाही. तत्कालिक प्रश्‍नांचे समर्थन किंवा विरोध असेल तर त्या लेखकांनी घेतलेली भूमिका तत्कालिक ठरते. कोणता प्रश्‍न चर्चेतून सोडवण्याची मानसिकता दिसत नाही. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे. विचारवंत, लेखकांना गांभीर्याने घेतले जात नाही. त्यांची बाजू समजून घ्यायला वेळ आहे कुणाकडे? सोयीस्कर अर्थ लावून त्याचे राजकारण होते. त्यांचा आवाज दाबला जातो; पण ही स्थिती बदलेल. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठामपणे भूमिका मांडत जातील.
-अभिजित पाटील

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com