सांगली पालिका आयुक्तांकडून संशयास्पद बेकायदेशीर कामे 

सांगली पालिका आयुक्तांकडून संशयास्पद बेकायदेशीर कामे 

सांगली - घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची घाईगडबडीत दिलेली वर्क ऑर्डर, मिरज पाणी योजनेच्या मंजुरीतील गैरव्यवहार, ड्रेनेज ठेकेदाराला देण्यात आलेल्या पावणेसहा कोटींच्या बिलांवरून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कारभाराचे सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत वाभाडे काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य विष्णू माने यांनी तर खेबुडकर यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बेकायदेशीर कामे झाली असून यातला त्यांचा इंटरेस्ट उघड झाल्याचा गंभीर आरोप केला.

राष्ट्रवादीने काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. महापौर हारुण शिकलगार यांनी आजची सभा तहकूब करुन येत्या 18 डिसेंबरला ती पुन्हा घेण्यात येईल, असे जाहीर केले. 
गेल्या महिन्यात राष्ट्रवादीने प्रशासनाविरोधात चाबूक फोड आंदोलन केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. फायली तटल्याचा राग होताच. त्याला आज महासभेत तोंड फुटले. यानिमित्ताने प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचे वाभाडेच सदस्यांनी काढले.

सुरेश आवटी, विष्णू माने, गौतम पवार, उपमहापौर विजय घाडगे, शेडजी मोहिते यांनी एका पाठोपाठ एक मुद्दे उपस्थित केले. मिरज अमृत योजनेची दिलेल्या मंजुरीवरून स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी स्मृती पाटील यांना तुम्ही ठराव कायम नसताना कार्यादेश दिलाच कसा असा जाब विचारला. त्यालाही त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. या मुद्दयावर गटनेते किशोर जामदार आणि सुरेश आवटी यांचे मौन सूचक होते. आवटी यांनी फक्त मिरजेसाठी पाणी योजना हा प्राधान्यक्रमाचे विषय नाही मात्र आयुक्तांची याबाबतची गतीमानता संशयास्पद असल्याचे मत मांडले.

साऱ्या भानगडी आता चव्हाट्यावर

विष्णू माने यांनी तर आयुक्तांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले,"" दोन लाखांच्या कामात सतरा त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचूप बिले देतात. तीन तीन अलिशान गाड्या रातारात ऐनवेळचे ठराव करून खरेदी करतात. स्वतःच्या इंटरेस्टच्या फायलीत त्यांची गतीमानता खूपच दिसते. एरवी मात्र त्यांच्या हात कायमचा आखडून राहतो कसा? ते महापालिकेत आल्यानंतर सर्वाधिक भानगडी झाल्या आहेत. ते आमच्या आंदोलनाचा उल्लेख खासगीत नौटंकी असा करतात मात्र त्यांच्या साऱ्या भानगडी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यांच्या काळात सर्वाधिक बेकायेदशीर कामे झाली आहेत. '' 

आज आयुक्त सभेस गैरहजर राहिल्यानेही सारे सदस्य संतप्त होते. ते जाणिवपुर्वक काही तरी काम काढून सभा टाळत आहेत असा आरोप करण्यात आला. अमृत योजनेला आठ टक्के जादा दराने मंजुरी द्यायचा आयुक्तांचा निर्णय हा 12 कोटींचा घोटाळा असून त्या रकमेची जबाबदारी आयुक्तांवर निश्‍चित करावी अशी मागणी शेखर माने यांनी केली. मात्र महापौरांनी तसा ठराव मात्र केला नाही.

अविश्‍वास ठराव मांडायचे धैर्य दाखवा

गौतम पवार म्हणाले,"" इतके सारे आरोप तुम्ही करीत आहात तर मग त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडायचे धैर्य दाखवा.'' त्यावर हा ठराव करु मात्र तो मंजूर करून आणायची जबाबदारी घ्या, असे आव्हान मैन्नुद्दीन बागवान यांनी दिले.

 बेकायदेशीर कामांना चाप लावल्याने अनेकांची पोटदुखी -  खेबुडकर 

" मी कार्यालयीन कामासाठीच बाहेरगावी आहे. काहींच्या बेकायदेशीर कामांना चाप लावल्यानेच आरोप सुरु आहेत. मी त्याला डगमगणार नाही. उपलब्द निधी आणि कामांचे प्राधान्यक्रम ठरवूनच फाईलींचा निपटारा केला आहे. नियमाच्या अधिन राहूनच जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले आहे. दीड वर्षात 3987 फाईली मार्गी लावल्या असून सुमारे 187 कोटी निधीची कामे मार्गी लावली आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या विष्णू मानेंचा बोलवता धनी वेगळा आहे. हेच माने सकाळी सातपासून रात्री बारापर्यंत कोणत्या फायलीच्या मंजुरीसाठी माझ्याकडे चकरा मारत होते? याची सारी माहिती पालिका वर्तुळात सर्वांना आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही. माझ्यावरील केलेल्या कोणत्याही एका बेकायदेशीर कामाचा आरोप सिध्द करावा. मी तत्काळ राजीनामा देऊन घरी बसायला तयार आहे.'' 

- रवींद्र खेबुडकर, 
आयुक्त सांगली,मिरज,कुपवाड शहर महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com