स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे सातपुते

स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे सातपुते

सांगली - राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा देत  आज स्थायी समिती सभापतिपदी बसवेश्‍वर सातपुते यांची बिनविरोध निवड केली. आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत श्री. सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्‍चित झाली आहे. अपेक्षित सत्तानाट्य रंगण्याआधीच निवडणुकीचा फैसला झाला. 

काल पाच जणांनी अर्ज नेल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती.

गतवेळी दुफळीमुळे बहुमत असूनही काँग्रेसला सभापतिपद गमवावे लागले होते. हे शल्य धुऊन काढण्याचे आदेश नेते पतंगराव कदम यांनी दिले होते. संधी कोणाला याचा निर्णय नेत्या जयश्री पाटील देणार होत्या. प्रत्यक्षात उमेदवारीसाठी महापौर हारुण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांच्यात चुरस झाली. महापौरांनी किशोर लाटणे यांच्यासाठी, तर गटनेत्यांनी सातपुतेसाठी आग्रह धरला. 

तत्पूर्वी बंडोबांना थंड  करायचे झाल्यास राष्ट्रवादी, विरोधी स्वाभिमानी आघाडीच्या नेत्यांशी चर्चेसाठी काँग्रेसचे शहर  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी नेते जयंत पाटील, संजय बजाज, गौतम पवार, शेखर माने यांच्याशी संपर्क साधला. थेट नेत्यांशीच संपर्क साधल्याने काँग्रेसमधील बंडोबाच्या हालचालींनी खीळ बसली. 

उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले दिलीप पाटील चर्चेच्या पहिल्या टप्प्यातच मागे पडले. रोहिणी पाटील यांच्यासाठी त्यांचे वडील  नानासाहेब महाडिक यांनीही आग्रह धरला. मात्र सातपुतेंना संधी देण्यात जामदार यशस्वी झाले. अर्थात यामागे ‘मिरज पॅटर्न’ चे गणित पक्के होते.  शिवाय सातपुते यांनी महापौर पदाची संधी हुकल्याने स्थायी समिती सभापतिपदासाठी सर्व ती तयारी केली  होती. त्यांच्या या तयारीमुळे काँग्रेसमधील विरोधकही  शांत झाले. 

आज दुपारी अडीचच्या सुमारास सातपुते  यांनी अर्ज दाखल केला. त्याच्यासमवेत महापौर शिकलगार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, बबिता मेंढे, मृणाल पाटील, प्रशांत  पाटील आदी उपस्थित होते. एकमेव अर्ज दाखल  झाल्याने उद्या (ता.१३) सकाळी होणाऱ्या स्थायीच्या बैठकीत त्यांची निवड जाहीर होईल. 

सभापती काँग्रेसचाच व्हावा यासाठी आम्ही एकत्र केलेल्या प्रयत्नांना यश आले. काँग्रेसच्या आठ सदस्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे तसेच राष्ट्रवादीने केलेल्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.  
- हारुण शिकलगार, महापौर 

काँग्रेस-राष्ट्रवादीचा पालिकेतील छुपा कारभार यापूर्वी सुरूच होता. आता मिरज पॅटर्नमुळे तो उघडपणे चव्हाट्यावर आला. बदनाम ‘मिरज पॅटर्न’चे नेते एकत्र आले आहेत. नव्या सभापतींनी भ्रष्टाचार पाठीशी घालू नये. अन्यथा नेहमीप्रमाणेच भ्रष्ट कारभाराला रोखू.
- शेखर माने,  नेते, उपमहापौर गट 

अमृत योजनेचे नऊ कोटी जादा दराने मंजुरी देण्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘मिरज पॅटर्न’च्या नेत्यांनी उघड गट्टी केली, मात्र आम्ही त्यांचे हे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. भ्रष्ट कारभाराला आमचा विरोध कायमच राहील.
- गौतम पवार,  नेते, स्वाभिमानी आघाडी

काँग्रेसने प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला बिनविरोध निवडीसाठी मदत केली होती. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी आघाडीचे गौतम पवार, नगरसेवक शेखर माने यांच्याशी बिनविरोध निवडीसाठी चर्चा केली होती. त्यांनी प्रतिसाद दिल्यानेच निवडणूक बिनविरोध झाली. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून आम्ही एकत्र आलोत. त्या दिशेने आणखी एक पाऊल पडले.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com