सांगली महापालिका निवडणुक प्रचाराची आज सांगता

 सांगली महापालिका निवडणुक प्रचाराची आज सांगता

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाच वाजता होत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

त्यानंतर पुढचे दोन दिवस ‘रात्रीस खेळ चाले’ची शक्‍यता आहे. एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या रणधुमाळीच्या निमित्ताने तिन्ही शहरांचे वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार, याचीच चर्चा सर्वत्र होतेय. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, लोकशाही आघाडी, सांगली सुधार समिती, आप अशी बहुरंगी लढत होत असलेल्या निवडणुकीत तेरा दिवसांत चांगलाच रंग भरला गेला आहे. तीन शहरांतील प्रभागांची पुनर्रचना झाल्यानंतर वीस प्रभाग अस्तित्वात आले. तेथील ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. अवाढव्य प्रभागात प्रचारासाठी उमेदवारांना तेरा दिवस होते. पदयात्रा, कोपरा सभा, बैठका, नेत्यांच्या सभा असा धडाकाच या काळात लावला गेला.

सत्ताधारी काँग्रेसवर तोफा डागल्या गेल्या. साहजिकच आघाडीतील पक्ष राष्ट्रवादीही त्यातून सुटली नाही. आघाडीकडून भाजपच्या कारभारावर हल्लाबोल झाला. शिवसेनेने या दोन्ही पक्षांवर नेम धरून बाण सोडले. त्यात सुधार समितीने मुद्यांवर प्रचार केला. लोकशाही आघाडीने ऐनवेळी बांधणी करीत इतर पक्षांच्या उमेदवारांची दमछाक केली. 

आता प्रचार टिपेला पोचला आहे. बहुतांश पक्ष उद्या (ता. ३०) पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करतील. उमेदवारांनी हजारो समर्थक, कार्यकर्ते, मतदारांसह पदयात्रा काढण्याचे ठरवले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबेल आणि त्यानंतर अंतर्गत खेळ्या सुरू होतील. पोलिस, प्रशासनासमोरील आव्हान असेल.

मुख्य नेते आलेच नाहीत..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे अशी मातब्बर नेतेमंडळी या प्रचाराच्या रणांगणात आलेच नाहीत. त्यामुळे काहीशी रंगत कमी पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com