सांगली पालिका निवडणूकः घटला टक्का, कुणाला धक्का!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत ४५१ उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रबद्ध झाले. प्रशासनाने शंभर टक्के सुटी आणि पावसाने उघडीप दिलेली असताना अवघे ६१.२४ टक्के मतदान झाले.

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत ४५१ उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रबद्ध झाले. प्रशासनाने शंभर टक्के सुटी आणि पावसाने उघडीप दिलेली असताना अवघे ६१.२४ टक्के मतदान झाले.

एकूण चार लाख २३ हजार १७९ मतदारांपैकी दोन लाख ५९ हजार ११२ मतदारांना आपला हक्क बजावला. सकाळच्या टप्प्यातील अनुत्साह आणि सायंकाळच्या टप्प्यात प्रचंड चढाओढीने मतदान झाले. तरीही मताचा टक्का गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत अडीच टक्‍क्‍याने घसरला. 

तीनही शहरातील २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ५४४ केंद्रांवर मतदान झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सांगली सुधार समिती, स्वाभिमानी आघाडी, लोकशाही महाआघाडी, अपक्ष महाआघाडी, एमआयएम यांच्यासह अपक्ष असे एकूण ४५१ उमेदवार रिंगणात होते. 

गेला महिनाभर सुरू असलेली रणधुमाळी मतदानाच्या निर्णायक टप्प्यावर अधिकच गतिमान झाली. प्रत्येक केंद्रांवर प्रचंड ईर्षा पाहायला मिळाली. मतदारांना आणण्यासाठी उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. किरकोळ वाद, बाचाबाची वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेत या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. 

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत १० टक्केच मतदान झाले. त्यानंतर वेग थोडा वाढला. दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी घेतली जात होती. त्यात सरासरी दहा ते बारा टक्‍क्‍यांनी वाढ दिसत होती. दुपारी दीडपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत २७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान चालले. अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणाला मतदान केंद्रात असलेल्यांना आत घेऊन प्रक्रिया पुढे सुरू ठेवली. 

निवडणुकीत संवेदनशील १६४ मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त तैनात होता. काही ठिकाणी केंद्रांना छावणीचे स्वरूप आले होते. मतदार खेचण्यावरून किरकोळ वाद झाले. वादावादी वगळता अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील भागात शस्त्रधारी पोलिस तैनात होते. 

साडेपाचनंतर मतदान
यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूक होत असल्याने १८ प्रभागांत चार, दोन प्रभागात तीन उमेदवार आहेत. चार उमेदवारांना मतदान करण्यासाठी किमान एक ते सव्वा मिनिटाचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यानुसार मतदान केंद्रांवर नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात अधिक वेळ लागल्याने साडेपाचनंतरही रांगा कायम होत्या. केंद्राच्या आतील मतदारांना मतदान केंद्रांत घेण्यात आले. त्यांना चिठ्ठी देण्यात आली. 

अडीच टक्के घट
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवली. त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे अंतिम आकडेवारी स्पष्ट करते. गतवेळी ६३.७१ टक्के मतदान होते. यावेळी त्यात अडीच टक्‍क्‍यांची घट आहे.

अपक्षांना भाव? 
निवडणूक निकालाबाबत कमालीचा संभ्रम आहे. चार ते पाच अपक्षांची सत्ताप्राप्तीसाठी गरज भासेल, असा राजकीय वर्तुळातून सूर असून त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस आहे. आज रात्रीपासूनच नेत्यांनी रेसमधील अपक्षांशी संपर्क साधला असून त्यातील काही अपक्ष रात्रीपासूनच आऊट ऑफ कव्हरेज गेले आहेत.

थंड प्रचाराचा फटका
गेल्या काही वर्षांत मतदानाचा टक्का वाढत असताना यावेळी महापालिकेचा टक्का मात्र घटला. यामागची कारणे शोधताना संपूर्ण निवडणुकीचा प्रचारच रंगला नसल्याचे कारण स्पष्टपणे पुढे येते. मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. प्रचारातील मुद्देही स्थानिक न राहता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील राहिले. महापालिकेतील घोटाळ्यांवर सर्वपक्षीय मौन आणि विरोधकांनीही टाळलेले ते मुद्दे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेले घाऊक पक्षांतर, त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण यातला फरकच पुसला गेला. त्यामुळेही मतदारांमध्ये अनुत्साह राहिला. न रंगलेल्या प्रचाराबाबत ‘सकाळ’ने प्रारंभपासून लक्ष वेधले होते. ही निवडणूक मुद्द्यावर न आल्याचाही हा परिणाम असल्याचे जाणवते. 

निकाल उद्या अकरापासून 
महापालिकेचे कारभारी कोण, याचा फैसला शुक्रवारी (ता. ३) होणार आहे. सकाळी दहापासून मिरजेतील शासकीय गोदामात मतमोजणी सुरू होईल. पहिला कल सकाळी अकरापर्यंत हाती येण्याची अपेक्षा आहे. दुपारी तीनपर्यंत बहुतांश निकाल हाती येतील. 
 

Web Title: Sangli News corporation election report