भाजपतील ‘इनकमिंग’ला तूर्तास ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

कर्नाटकच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाले तरच भाजपत, अन्यथा दुसरा पर्याय, असे अनेकांनी निश्‍चित केले आहे. त्यामुळे पक्षातील ‘इनकमिंग’ला थोडासा ‘ब्रेक’ लागला आहे. त्याचा काहीसा परिणाम पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर झाला आहे.

सांगली - कर्नाटकात हात की कमळ, याची उत्सुकता देशभरात निर्माण झाली असताना सांगलीमध्ये मात्र ती अधिकच दिसू लागली आहे. कर्नाटकच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाले तरच भाजपत, अन्यथा दुसरा पर्याय, असे अनेकांनी निश्‍चित केले आहे. त्यामुळे पक्षातील ‘इनकमिंग’ला थोडासा ‘ब्रेक’ लागला आहे. त्याचा काहीसा परिणाम पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर झाला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी देशात नरेंद्र मोदींचे वारे वाहत असताना अनेकांनी भाजपत प्रवेश केला. देशात भाजपची सत्ता आल्यानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकजण पक्षाकडे आकर्षित झाले. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही ‘आयाराम’च्या प्रवेशामुळे ताकद वाढली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांबरोबर ग्रामपंचायतीमध्येही भाजपने चमत्कार घडवला. त्यामुळे आता ‘मिशन महापालिका’ फत्ते करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळी आणि वरिष्ठ नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. 

परंतु मध्यंतरी देशात इतरत्र झालेल्या काही निवडणुका व पोटनिवडणुकांमध्ये भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तसेच सोशल मीडियांवरही भाजप काहीसा ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणारी मंडळी अद्यापही अंदाज घेत आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. काँग्रेसने नुकताच मेळावा घेऊन रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाणारी काही मंडळी थबकली आहेत. तशातच शेजारील कर्नाटकमधील निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 

हात की कमळ?
मतदानोत्तर चाचणीनंतर कर्नाटकात बहुमत मिळण्याबाबत साशंकता आहे. हात की कमळ? अशी उत्सुकता ताणली आहे. तेथील निकालावर महापालिका क्षेत्रातील अनेकांनी भाजप प्रवेशाचा निर्णय लटकत ठेवला आहे. भाजपने उमेदवारी मागणी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २८२ जणांनी अर्ज नेले आहेत. अद्याप ५० ते ६० अर्ज भरणे बाकी आहेत. १५ मे च्या कर्नाटक निकालानंतर उमेदवारांचा कल स्पष्ट होईल.

Web Title: Sangli News corporation election special